Pimpri: कोरोना बाधितांचा आकडा दहावर, ‘पॉझिटीव्ह’ रुग्ण युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, आयर्लंड, दुबईमार्गे शहरात

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या 244 क्षेत्रीय सर्वेक्षण टिम

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना बाधितांची संख्या दहावर पोहचली आहे. मंगळवारी शहरात आणखीन एक कोरोना ‘पॉझिटीव्ह’ रुग्ण सापडला असून, हा रुग्ण युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका येथून आयर्लंड येथे गेला. तेथे राहून दुबई मार्गे पिंपरी-चिंचवड शहरात आला आहे. त्याच्या सहवासात आलेल्यांची माहिती घेवून त्यांना घरातील विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात येणार आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या 244 क्षेत्रीय सर्वेक्षण टीम तयार करण्यात आल्या आहेत.

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आणि नविन भोसरी रुग्णालयामधून आजपर्यंत एकूण 80 कोरोना संशयित व्यक्तींचे घश्यातील द्रव्याचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) तपासणी करिता पाठविण्यात आले आहेत. यातील एका व्यक्तीचा अहवाल ‘पॉझिटीव्ह’ आला असून, उर्वरीत नऊ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. महापालिका हद्दीत आजपर्यंत दहा कोरोना बाधित रुग्ण रुग्णालयांमध्ये दाखल असून, या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर दोन्ही रुग्णालयांमधील ‘आयसोलेशन’ कक्षामध्ये उपचार सुरु आहेत.

तसेच अहवाल निगेटिव्ह आलेल्यां रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. त्यांना घरात ‘क्वॉरनटाईन’ खाली ठेवण्यात आले आहे. आज करोना ‘पॉझिटीव्ह’ आढळलेला रुग्ण हा युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका येथून आर्यलँड येथे राहून दुबई मार्गे शहरात आला आहे. त्याच्या सहवासात आलेल्यांची माहिती घेवून त्यांना घरातील विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात येणार आहे. आज मंगळवारी एकूण सात संशियतांच्या घश्यातील द्रव्याचे नमुने ‘एनआयव्ही’कडे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत.

कोरोना संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेमार्फत 244 क्षेत्रीय सर्वेक्षण टिम नियुक्त करण्यात आल्या आहेत. या टीममध्ये वैद्यकीय कर्मचारी, शिक्षण मंडळ कर्मचारी, महापालिका आयटीआय मधील कर्मचारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यांच्यामार्फत संपुर्ण महापालिका हद्दीत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या कर्मचाऱ्यांची आज कार्यशाळा घेण्यात आली. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, जेष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब होडगर, डॉ. विजया आंबेडकर, डॉ. शैलजा भावसार, डॉ. संगिता तिरुमणी, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित माने, डॉ. राहुल राऊत, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड आदी उपस्थित होते.

आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहरातील आयसीयु उपलब्ध असलेल्या सर्व खासगी रुग्णालय व्यवस्थापकांची बैठक घेतली. त्यांच्याकडे उपलब्ध असलेली बेड संख्या, व्हेटींलेटर उपकरणांची माहिती घेतली. कोरोना आजाराचे संक्रमण थांबविण्यासाठी नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये तसेच फ्लुसारखी लक्षणे दिसून आल्यास नागरिकांनी तात्काळ वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी. चीन, डेमोक्रेटिक रिपब्लीक ऑफ कोरिया, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, इटली, इरान, दुबई, सौदी अरेबिया व युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशांमधून आलेल्या सर्व नागरिकांनी किमान 14 दिवस घरांमध्येच ‘होम ‘क्वॉरंटाईन’मध्ये राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महापालिकेमार्फत हेल्पलाईन कार्यान्वित करण्यात आलेली आहे. हेल्पलाईन क्रमांक 8888006666 हा आहे. राज्य शासनामार्फत कार्यान्वित idsp.mkcl.org या संकेतस्थळावर संशयित करोना रुग्णांबाबत माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.