Pimpri : कोरोना दारासमोर येऊन उभा आहे, अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडा ; ‘एमपीसी न्यूज’चे कळकळीचे आवाहन

एमपीसी न्यूज – जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्रेयेसुस यांनी कोरोना विषाणू अजून बराच वेळ आपल्या सोबत राहणार असल्याचे सांगितले आहे. सर्व देश लाॅकडाऊन पाळत असून सुद्धा दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ दिसून येत आहे. यामध्ये मुंबई आणि पुण्यात रुग्ण झापाट्याने वाढत असल्यामुळे नागरिकांनी पूर्वी पेक्षा अधिक खबरदारी बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. आता कोरोना आपल्या दारासमोर येऊन उभा आहे. त्यामुळे अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडा, असे कळकळीचे आवाहन ‘एमपीसी न्यूज’च्यावतीने करण्यात आले आहे.

जगात आत्तापर्यंत 26 लाख लोकांना कोरोनाचे संक्रमण झाल्याचे समोर आले आहे. तर यामुळे 1 लाख 83 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात 21 हजार 700 कोरोना संक्रमणाच्या केसेस पुढे आलेल्या आहेत तर आतापर्यंत 686 लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात 5652 लोक कोरोना बाधित आहेत तर 269 लोकांचा त्याच्यामुळे मृत्यू झाला आहे. ही सर्व आकडेवारी चिंतेत टाकणारी असून धोका आता आपल्या दारापर्यंत आला आहे असे म्हणायला वाव आहे. कोरोनाच्या इलाजासाठी अद्याप पर्यंत लस निर्माण न झाल्यामुळे यापासून बचावाचा ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ हा
एकच पर्याय उपलब्ध आहे.

पुणे आणि मुंबई या दाट लोकवस्तीच्या शहरात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे. अधिक रुग्ण संख्येमुळे ही शहरे ‘रेड झोन’ मध्ये सामाविष्ट करण्यात आली आहेत. यामधील ‘हाॅटस्पाॅट’ ओळखून या परिसरात लाॅकडाऊनचे नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. गर्दी होणार नाही यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. तरीही काही नागरिक नियम झुगारून अनावश्यक बाहेर फिरताना दिसत आहेत. काही बेजबाबदार नागरिक फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क यांचा सार्वजनिक ठिकाणी उपयोग करत नाही. माॅरनिंग वाॅक, इव्हीनिंग वाॅक, कुत्र्याला फिरवण्यासाठी बाहेर फिरणारे वा विनाकारण बाहेर फिरणाऱ्या लोकांवर कारवाई होत असताना देखील लोक सुधारण्याचे चिन्ह दिसत नाही, हे चित्र गंभीर आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितल्यानुसार 30 एप्रिल ते 15 मे दरम्यान कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ दिसून येऊ शकते. त्यामुळे कोरोना सारख्या आजारापासून आपल्या आरोग्याचे रक्षण आपल्यालाच करायचे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित करताना राज्य दोन संकटाचा सामना एकाच वेळी करत असल्याचे सांगितले. एक कोरोना आणि दुसरे आर्थिक संकट आणि ही दोन्ही संकटांचे युद्ध जर आपल्याला जिंकायची असतील तर नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. कोरोनारुपी शत्रू दिसत नाही त्यामुळे मोठी अडचण झाली आहे. अशा या न दिसणाऱ्या शत्रूला हरवण्यासाठी आपल्याला काही दिवस घरातच राहावे लागणार आहे.

‘एमपीसी न्यूज’चे सर्व कर्मचारी गेल्या एक महिन्यापासून घरातूनच काम करत आहेत. कोरोनापासून बचावासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेत आहेत. त्यामुळे ‘एमपीसी न्यूज’ तुम्हाला सुद्धा आवाहन करते की, अत्यावश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडा. बाहेर पडताना मास्कचा जरूर वापर करा, गर्दी टाळा, सार्वजनिक ठिकाणी योग्य ‘फिजिकल डिस्टन्स’ मेंटेन करा, शक्यतो किराणा माल जवळच्या दुकानातूनच खरेदी करा, हात सारखे स्वच्छ धुवा, तोंडाला,नाकाला व डोळ्यांंना स्पर्श करू नका, आजुबाजुला स्वच्छता राखा. बाहेर पडून आपले आणि इतरांचे आरोग्य धोक्यात घालू नका; घरातच रहा सुरक्षित रहा !

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.