Pimpri: शहारातील 357 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू, आयुक्त म्हणतात मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्नशील

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 357 नागरिकांचा कोरोनाने आजपर्यंत बळी घेतला आहे. वाढत्या रुग्णसंख्येबरोबर मृत्यूमध्ये देखील वाढ होताना दिसून येत आहे. शहरातील 357 जणांचा आणि शहराबाहेरील पण पालिकेच्या रुग्णालयात उपचारादरम्यान 84 अशा एकूण 441 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये वयोवृद्धांसह युवकांचा समावेश होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, शहरातील मृत्यूदर 1.08 टक्क्यांवर स्थिर असून कमी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

शहरातील रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामध्ये श्वास घेण्याचा त्रास होणा-या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मृत्यूच्या संख्येत देखील वाढ होताना दिसून येत आहे. कोरोनाचा पहिला बळी 12 एप्रिल रोजी गेला  होता. थेरगाव भागातील एका पुरुषाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आजपर्यंत शहरातील 357 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. मध्यमवर्गीय भागातील नागरिकांची मृतांमध्ये संख्या जास्त आहे.

शहरातील कोरोनाच्या एकूण रुग्ण संख्येच्या तुलनेत मृत्यूचा आकडा अवघा दीड ते पावणेदोन टक्के असला. तरी, मागील काही दिवसांपासून मृत्यूमध्ये वाढ होऊ लागली आहे. दिवसाला 10 ते 15 जणांचा मृत्यू होत आहे. मृतांमध्ये युवकांचाही समावेश दिसून येत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. वयोवृद्ध आणि कोरोनासह विविध गंभीर आजार असलेल्यांचे प्रमाण जास्त आहे.
त्यामध्ये निमोनिया, मधुमेह असलेल्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे विविध आजार असलेल्यांनी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर पूर्वीचे आजार डोकेवर काढतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेकडून केले जात आहे.

याबाबत बोलताना आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ”सध्या पिंपरी-चिंचवड शहराचा कोरोनाचा मृत्यूदर 1.08 टक्केला स्थिर आहे. महाराष्ट्राचा मृत्यूदर 3.03 टक्के आहे. पुणे जिल्ह्याचा दर 2.04 टक्के आहे. पिंपरी-चिंचवड शहराचा 1.08 लाच स्थिर आहे. जूनमध्ये 1.04 टक्क्यांवर कमी होता. दरम्यानच्या कालावधीत मृत्यूदर थोडासा वाढलेला आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी सुविधायुक्त जादा बेडची निर्मिती केली आहे. ती वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.