Pimpri Corona News : ‘एचए’ला कोरोना लस आणि रेमडेसिवीरच्या उत्पादनाची परवानगी द्या : श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज – पिंपरी येथील हिंदूस्थान अ‍ॅन्टिबायोटिक्स (एच ए) गेल्या अनेक दशकांपासून औषध निर्मितीमध्ये कार्यरत आहे. ‘एचए’ला कोरोना प्रतिबंधक लस, रेमडेसिवीरच्या उत्पादनाची परवानगी देणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने एक संधी दिली तर एचएमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीची निर्मिती आणि रेमडिसिवीर इंजेक्शनचे उत्पादन होऊ शकेल. कंपनीची तेवढी क्षमता आहे. त्यामुळे लाखो लोकांचे जीव वाचतील. लसीचे उत्पादन होईल आणि ‘एचए’ला पुन्हा सुवर्णकाळ मिळेल. त्याकरिता ‘एचए’ला लस निर्मिती, रेमडेसिवीरच्या उत्पादनाची तत्काळ परवानगी द्यावी, अशी आग्रही मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

याबाबत खासदार बारणे यांनी केंद्रीय रसायन व खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना पत्र पाठविले आहे. याबाबत मंत्री गौडा यांच्याशी दुरध्वनीद्वारे चर्चाही केली. परवानगी देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.

खासदार बारणे म्हणाले, केंद्र सरकारने देशातील पेनिसिलिन निर्मितीचा पहिला कारखाना पिंपरी येथे सुरु केला. मध्यंतरी हा कारखाना डबघाईला आला असताना केंद्र सरकारच्या माध्यमातून या कारखान्याला 400 कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळवून दिली.

‘एचए’ने कोरोना कालावधीत पीपीई किट, सॅनिटायझर इतर कोरोना विषयक उत्पादनांची निर्मित केली. त्यातून 100 कोटी रुपयांची उलाढाल झाली. त्यामुळे कोरोनावरील लस निर्मितीची ‘एचए’ला परवानगी देणे गरजेचे आहे. कंपनीने तसा अर्जही केंद्र सरकारकडे केला आहे. दुस-या लाटेत 2 कोटी 58 लाख लोकांना कोरोनाची बाधा झाली. त्यातील 2 लाख 77 हजार लोकांचा मृत्यू झाला. देशातील प्रत्येक नागरिकाला कोरोना प्रतिबंधक लस देणे गरजेचे आहे.

सध्या सीरम इन्स्टिट्यूट, भारत बायोटेक कंपनीमार्फत कोरोना प्रतिबंधक लसीचे उत्पादन सुरु आहे. केंद्र सरकार कोरोनाशी लढा देण्यासाठी सज्ज आहे. लसीचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्नशिल आहे. ऑगस्ट ते डिंसेबर या कालावधीत दोन कोटी डोसचे उत्पादन होणे आवश्यक आहे. त्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवत आहे. केंद्र सरकार मागणी आणि पुरवठा यात संतुलन साधण्याठी आवश्यक पाऊलचे उचलत आहे. दुसरी लाट तीव्र आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे.

पिंपरीतील हिंदूस्थान अ‍ॅन्टिबायोटिक्स कंपनी हा केंद्र सरकारचा उपक्रम असून 1955-56 मध्ये कंपनीची स्थापना झाला. कंपनीत पेनिसिलिनसह विविध औषधांचे उत्पादन केले जाते. टोचण्यायोग्य लसी, गोळ्या, औषधे, पातळद्रव्य आदी औषध निर्माण शास्त्राप्रमाणे तयार केली जातात. मागील काही संसर्गजन्य, साथी आजारांचा विचार करता ‘एचए’ने केंद्र सरकारला नेहमीच मदत केली आहे. आता केंद्र सरकारने लस निर्मिती, रेमडेसिवीरच्या उत्पादनाची एक संधी एचएला दिली तर याठिकाणी रेमडेसिवीर आणि कोरोना प्रतिबंधक लसीचे उत्पान होऊ शकेल.

‘एचए’ची तेवढी क्षमता आहे. त्यामुळे लाखो लोकांचे जीव वाचतील. त्याबरोबर लसीचे उत्पादन होईल आणि एचएल पुन्हा सुवर्णकाळ मिळेल. भारत सरकारचे लस उत्पादनात मोठे पाऊल ठरेल. सरकाराला आर्थिक उत्पन्नही मिळेल. स्वस्त दरात औषध उपलब्ध होईल, असेही खासदार बारणे यांनी निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.