Pimpri Corona News : कोविड हॉस्पिटल्स ‘सीसीटीव्ही’च्या नियंत्रणाखाली आणा : दीपक मोढवे-पाटील

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

एमपीसीन्यूज : पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना उद्रेक दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णांच्या नातेवाइकांना सरकारी तसेच खासगी कोविड केअर सेंटरमध्ये प्रवेश करता येत नाही. परिणामी रुग्ण रुग्णालयात दाखल केल्यानंतर तेथील सोयी-सुविधा आणि उपचारांबाबत रुग्णालय प्रशासन व रुग्णाच्या नातेवाइकांमध्ये वादाचे प्रसंग घडत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने कोविड केअर सेंटर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नियंत्रणात आणावेत, अशी मागणी भाजपा वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष तथा माजी शहर उपाध्यक्ष दिपक मोढवे-पाटील यांनी केली आहे.

याबाबत मोढवे-पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना निवेदन पाठवण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, राज्यासह पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. शासकीय तसेच खासगी कोविड केअर सेंटरमध्ये नव्याने बाधित होणाऱ्या रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत.

तसेच, कोविड सेंटरमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांना प्रवेश दिला जात नाही. आठ ते दहा दिवस काही रुग्ण सेंटरमध्ये दाखल असतात. मात्र, संबंधित रुग्णांच्या उपाचार, सोयी-सुविधा यांबाबत हलगर्जीपणा केला जात असल्याच्या अनेक तक्रारी नागरीक करीत आहेत.

अनेकदा ऑक्सिजन पुरवठा बंद झाला तरीही संबंधित कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होते. राज्यात अनेक ठिकाणी खाजगी कोविड सेन्टर्स उघडण्यात आलेले आहेत पण तेथे आवश्यक सोयी सुविधा, उपचार या बाबत मोठा अभाव जाणवत आहे.

तसेच अनेकजण या परिस्थितीचा फायदा घेऊन फक्त पैसे कमावण्यासाठी म्हणून कोविड सेंटर्स चालू करत आहेत. परिणामी रुग्णांना योग्य ते उपचार मिळत नाहीत. उलट नागरिकांची लूट आणि रुग्णांच्या जीवाशी खेळ चालविला जात असल्याच्या तक्रारी आहेत.

प्रत्येक कोविड सेंटर व रुग्णालयाला सीसीटीव्ही कव्हरेज अनिवार्य करावे व त्याचा कंट्रोल हा पोलीस प्रशासन किंवा महानगरपालिका यांच्या अखत्यारीत द्यावा, अशी मागणी मोढवे-पाटील यांनी केली आहे.

महापालिका आयुक्तांनाही साकडे…

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनाही कोविड केअर सेंटरमधील सोयी-सुविधांबाबत संवेदनशीलपणे लक्ष घालावे, अशी मागणी मोढवे-पाटील यांनी केली आहे. शहरातील वाढती रुग्णसंख्या आणि उपलब्ध सोयी-सुविधा याचा विचार करुन ४-५ स्टार हॉटेल्सच्या रुम्स ताब्यात घेता येतील का? त्याठिकाणी रुग्णांना बेडची व्यवस्था करता येईल का? तसेच खासगी रुग्णालये आणि डॉक्टरांची सेवा अधिगृहीत करावी, याबाबत सकारात्मक विचार करावा, असेही मोढवे-पाटील यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.