Pimpri Corona News : कोरोना काळात रुग्णसेवा देणाऱ्या मानधनावरील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना महापालिका देणार कोविड भत्ता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, महापालिका इतर रुग्णालये, दवाखाने या ठिकाणी कोरोनाच्या काळात मानधनावर कार्यरत असलेल्या तज्ञ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, दंतशल्य चिकित्सक यांना 15 हजार रुपये, स्टाफनर्स व सर्व पॅरामेडीकल स्टाफ यांना 10 हजार, प्रयोगशाळा सहाय्यक / वर्ग 4 मधील कर्मचारी यांना 5 हजार याप्रमाणे मानधनाव्यतीरिक्त स्वतंत्र कोविड भत्ता देण्यात येणार आहे.

1 एप्रिल पासून 30 जून 2021 अखेर दरमहा हा भत्ता देण्यात येणार आहे. यासंदर्भात आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. येणाऱ्या प्रत्यक्ष खर्चास मान्यता देण्यात आली.

याबाबतची माहिती महापौर उषा ढोरे यांनी दिली. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष ॲड. नितिन लांडगे, उपमहापौर हिराबाई घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके उपस्थित होते.

महापालिकेच्या वैद्यकिय अत्यावश्यक सेवेकरीता एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरुपात तज्ञ वैद्यकिय अधिकारी, वैद्यकिय अधिकारी व पॅरामेडिकल कर्मचारी तसेच वर्ग 4 मधील कर्मचा-यांची कोवीड 19 चे कामकाजाकरीता नियुक्ती करण्यात येते. या मानधनावरील अधिकारी / कर्मचा-यांना सद्यस्थितीत शासन निर्णय व किमान वेतन दरानुसार मानधन दिले जात आहे.

महापालिका परिसरात 10 रुग्णालये व 27 दवाखाने कार्यरत आहेत. सद्यस्थितीत कोवीड 19 च्या रुग्णामध्ये वाढ होत असल्याने महापालिकेमार्फत कोवीड केअर सेंटर निर्माण करण्यात  आलेले आहेत.

वाढत्या रुग्णांचे पार्श्वभुमीवर वाढीव मनुष्यबळाची तातडीने आवश्यकता असलेने एकत्रीत मानधनावर 6 महिने कालावधीकरीता उमेदवारांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. तथापि,
कोवीड 19 च्या रुग्णांचे वाढते प्रमाण पाहता महापालिकेमार्फत नविन आकुर्डी रुग्णालय व नविन थेरगाव रुग्णालय कार्यान्वीत करणेचे प्रस्तावीत आहे.

यामुळे वर्ग 1 ते 4 या तांत्रिक संवर्गातील वाढीव मनुष्यवळाची तातडीने आवश्यकता आहे. महापालिका परिसरातील इतर रुग्णालयात महापालिकेच्या किमान वेतन दरापेक्षा जादा वेतन मिळत असल्याने वर्ग 1 ते 4 या तांत्रीक संवर्गातील वैद्यकीय अधिकारी / दंतशल्यचिकित्सक / स्टाफनर्स / ए.एन.एम / पँरामेडीकल स्टाफ व वर्ग 4 मधील कर्मचारी महापालिकेस उपलब्ध होत नाहीत.

महापालिकेमार्फत उमेदवारांना मिळणारे मानधन हे कमी वाटत असल्याने उमेदवार काम करण्यास इच्छुक नसतात किंवा महापालिका सेवेत रुजू झाल्यानंतरही राजीनामा देतात. त्यामुळे उमेदवारांना एकत्रित मानधनासह काही रक्कम कोविड भत्ता म्हणून अदा केल्यास रुग्णालयीन कामकाजाकरीता मनुष्यबळ उपलब्ध होतील. तसेच महापालिका सेवेत काम करण्यास प्राधान्य देतील. ही बाब विचारात घेवुन महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मानधनावर कार्यरत असलेल्या तज्ञ वैद्यकीय अधिकारी / वैद्यकीय अधिकारी तसेच दंतशल्य चिकित्सक यांना भत्ता देण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.