Pimpri Corona News: कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याने रुग्णसंख्या घटली ?

सरासरी दोन हजारांनी चाचण्या घटल्या

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रुग्णांची संख्या मागील काही दिवसांपासून कमी होत आहे. परंतु, काही दिवसांची चाचण्यांची आकडेवारी पाहिल्यास  चाचण्याही कमी झाल्याचे दिसून येत आहे. शहरात एप्रिल आणि मेच्या पहिल्या आठड्यापर्यंत दररोज सरासरी दहा हजार चाचण्या होत होत्या. सद्यस्थितीत मागील आठवड्यापासून रोज सरासरी आठ हजार चाचण्या होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. सरासरी दोन हजारांनी चाचण्या कमी झाल्यामुळे रुग्ण संख्या कमी दिसून येत आहे, हे  नाकारता येत नाही.

पिंपरी-चिंचवड शहरात फेब्रुवारीच्या पंधरवड्यापासून कोरोना  रुग्णंसख्या वाढू लागली. दुस-या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढले. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी जास्तीत जास्त चाचण्या होणे आवश्यक आहे. चाचण्यावरून संसर्गाचे प्रमाण  जास्त आहे की कमी हे दिसून येते. तसेच कोणत्या भागात किती रुग्ण आहेत, हे चाचण्यांवरून लक्षात येते.

महापालिकेने चाचण्यांचे प्रमाण वाढविले होते. दररोज 12 हजारांपर्यंत चाचण्या गेल्या होत्या. परंतु, मागील काही दिवसांपासून चाचण्या कमी झाल्यामुळे रुग्ण संख्या कमी झाल्याचे दिसून येत आहे.

शहरात 12 मे रोजी 10 हजार 180 चाचण्या झाल्या होत्या. त्यानंतर 13 मेला 8 हजार 875 चाचण्या झाल्या. 14 मेला 8 हजार 368, तर 15 मेला 8 हजार 93, 16 मेला 7639 आणि 17  मेला 6609  चाचण्या झाल्या. यावरून मागील पाच दिवसांपासून चाचण्यांमध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट झाली की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

एप्रिल महिन्यात शहरात 2 लाख 77 हजार 396 चाचण्या करण्यात आल्या होत्या. एवढ्या चाचण्या केल्यानंतर 70 हजार 285 रुग्ण आढळून आले होते. फेब्रुवारीपासून शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढायला सुरुवात झाली. ही दुसरी लाट आता कमी होत असली तरी पुढील काही महिन्यात तिसरी लाट येणार, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

त्यादृष्टीकोनातून उपाययोजना करा, अशा सूचना केंद्र आणि राज्य सरकारने दिल्या आहेत. त्यामुळे पुढील धोका ओळखून चाचण्यांचे प्रमाण वाढवणे आवश्यक आहे. चाचण्या कमी झाल्यास रुग्ण कमी झाल्याचे दिसून येईल आणि पुढे पुन्हा संसर्ग वाढू शकतो.

मागील काही दिवसांची आकडेवारी

तारीख    चाचण्या     रुग्ण

12 मे      10180    1790

13 मे      8875     1327

14 मे     8368      1109

15 मे     8093      959

16 मे     7639        914

17 मे     6609        846

18 मे      5012       605

 

महापालिकेच्या कोरोना चाचणी प्रमुख डॉ. वर्षा डांगे म्हणाल्या, “महापालिकेच्या चाचणी केंद्रांवर कोरोनाची चाचणी करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची चाचणी केली जाते. शहरातील खासगी प्रयोगशाळा रविवारी मेन्टेनन्ससाठी चाचणी  बंद असतात. त्यामुळे रविवारी, सोमवारी चाचण्या कमी झाल्याचे दिसून येते.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.