एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रुग्णांमध्ये दुपटीने वाढ होण्याचे दिवस वाढत चालले आहेत. रुग्ण दुपटीचा कालावधी 38 दिवसांवरून 70, 74 दिवसांवर गेला आहे. आता 120 दिवसांनी रुग्णांची संख्या दुप्पट होत असल्याची माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. सध्या दिवसाला साडेतीन  हजार चाचण्या केल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहरात 10 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. मार्च, एप्रिल, मे च्या मध्यापर्यंत रुग्णसंख्या नियंत्रणात होती. मे अखेर कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली. जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ झाली. ऑगस्टमध्ये देखील रुग्णवाढीचे प्रमाण कायम राहिले.

सप्टेंबरच्या पहिले पंधरा दिवसांत झपाट्याने वाढ होताना दिसून आली. सप्टेंबर अखेर आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात रुग्णवाढीला ‘ब्रेक’ लागला.शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या 85 हजाराच्या उंबरठ्यावर आहे. शहरात सक्रिय रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

शहरात कालपर्यंत 83 हजार 785 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.  त्यापैकी 78 हजार 149 जणांनी कोरोनाविरोधातील लढाई जिंकली आहे. सध्या 5 हजार 636 सक्रिय रूग्णांवर उपचार सुरू आहेत.  शहरातील 1432 जणांचा तर शहराबाहेरील, परंतु महापालिका रूग्णालयात उपचार  घेणार्‍या 559 अशा 1991 जणांचा कालपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, शहरातील कोरोनाचे रुग्ण दुपटीचा कालावधी 120 दिवसांवर गेला आहे. 29 सप्टेंबर रोजी 74 दिवसांवर होता. आता 120 दिवसांवर गेला आहे. आजपासून पुढील 120 दिवसांनी रुग्ण दुप्पट होतील. दिवसाला साडेतीन हजार चाचण्या केल्या जात आहेत. पाठीमागे गणेशोत्सव कालावधीत नागरिक एकत्र आल्यामुळे कोरोनाची रुग्णसंख्या वाढली होती.

आगामी काळात येणा-या नवरात्री, दसरा, दिवाळी हे सण खूप महत्वपूर्ण राहणार आहेत. नागरिकांनी खूप काळजी बाळगण्याची गरज आहे. अनलॉकमध्ये रेस्टॉरंट, बार, हॉटेल खुले केले आहोत. अन्न सेवन करायचे असल्यामुळे सगळे लोक मास्क काढूनच बसणार आहेत. खबरदारी घ्यायची आहे असे आवाहन करत आयुक्त हर्डीकर यांनी केले.

ते म्हणाले की, अनलॉक सुरु असला. तरी कोरोना आपल्यातून गेलेला नाही. को-मॉर्बिड, वृद्धांना विशेष अथवाने काळजी घेण्याची आवश्यकता आहे. त्यांनी लक्षणे दिसल्यास तत्काळ चाचणी करावी. माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेचा दुसरा टप्पा सुरु केला जात आहे. पुन्हा एकदा सगळ्या नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. लक्षणे असलेल्यांना तपासून आयसोलेट केले जाईल.

खासगी प्रॅक्टीस करणा-यांचीही बैठक घेतली होती. त्यांच्याकडे लक्षणे असलेले लोक आलेल्यांची मोफत तपासणी केली जाणार आहे. त्यांनी लक्षणे असलेल्या रुग्णांना पालिकेकडे पाठवावे. जास्तीत-जास्त लोकांची तपासणी वेळेत होईल. त्यामुळे त्यांच्यापासून इतरांना संसर्ग होणार नाही, असेही ते म्हणाले.