Pimpri Corona news: ऑक्सिजनची कमतरता, पण महापालिकेकडून उपाययोजना सुरु – आयुक्त राजेश पाटील

एमपीसी न्यूज – गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. यामुळे लिक्विड ऑक्सिजनची मागणी वाढली. कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनला मेजर थेरपी म्हणून बघितले जाते. त्याची कमतरता भासू लागली आहे. यामुळे काही हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन सप्लायबाबत समस्या पुढे आल्या आहेत. मंगळवारी थोडी अडचण निर्माण झाली होती. याबाबत महापालिका प्रशासन जागरूक असून उपाययोजना करत असल्याचे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.

खासगी रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर आयुक्त पाटील यांनी आज (बुधवारी) फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून शहरवासियांशी संवाद साधला.

आयुक्त पाटील म्हणाले, ऑक्सिजनबाबत महापालिका प्रशासन, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, विभागीय आयुक्त सौरभ राव आम्ही सर्व मिळून उपाययोजना करत आहोत. जागरुक आहोत. यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची टीम नेमली आहे. सर्व हॉस्पिटलशी संपर्क साधून आहोत.

_MPC_DIR_MPU_II

आपल्या जिल्ह्यामध्ये तयार होणारा ऑक्सिजन साठा आहे. त्याचबरोबर फिलर प्लॉट आहेत. त्या सर्व ठिकाणी अधिकारी नेमले आहेत. सर्व हॉस्पिटलला ऑक्सिजनचा साठा कसा सुरळीत पोहोचेल आणि सिलेंडर भरले जातील, याविषयी सर्व प्रकारची काळजी घेत आहोत.

निश्चितपणे पूर्ण व्यवस्थेवर ताण आहे. पण, याबाबतीत वेळोवेळी पाऊले उचलली जात आहेत. जे काही तातडीची पाऊले उचलण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही सुसज्ज आहोत. त्यामुळे खूप घाबरून जाऊ नये. नागरिकांनी कोरोना विषयक जबाबदारी पार पाडावी. लॉकडाऊनचे नियम पाळावेत. प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे.

कोरोनाची लढाई मोठी आहे. सर्व एकत्र आलो आणि आपली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडली. तर, निश्चितपणे कोरोना विरोधातील लढाई आपण जिंकू शकतो. ऑक्सिजन सप्लाय विषयी जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचत आहे. त्याविषयी शहानिशा करावी. प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवावा, असे आवाहनही आयुक्त पाटील यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.