Pimpri Corona news: महापालिका आयुक्त राजेश पाटील यांचा जम्बो कोविड सेंटरमधील रुग्णांशी संवाद

रुग्णालयाची केली पाहणी

एमपीसी न्यूज – पिंपरी, नेहरूनगर येथील जम्बो कोविड रुग्णालयाच्याबाबतीत वारंवार तक्रारी येत असल्याने महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी आज (मंगळवारी) रुग्णालयाची पाहणी केली. आयसीयू व इतर वाॅर्डातील रुग्णांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. रुग्णालयातील डॉक्टर संबंधित अधिकाऱ्यांना विविध सूचना दिल्या.

नेहरूनगर येथे पीएमआरडीएच्या वतीने 800 बेडचे जम्बो कोविड रुग्णालय उभारण्यात आले आहे. महापालिकेमार्फत हे रुग्णालय चालविले जाते. याठिकाणी 600 हून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. जम्बो कोविड रुग्णालयाबाबतीत वारंवार तक्रारी येत आहेत.

 

सोमवारी एक महिला रुग्ण जम्बोतून बेपत्ता झाल्याची नातेवाईकांनी आरोप केला होता. त्या पार्श्वभूमीवर आयुक्त राजेश पाटील यांनी मंगळवारी जम्बो कोविड रुग्णालयाची महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पाहणी केली.

अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, जम्बो कोविड रुग्णालयाचे समन्वय बाळासाहेब खांडेकर, प्रशांत जोशी, सुनील वाघमारे, डॉ पाठक, संग्राम कपाले आदी यावेळी उपस्थित होते.

आयुक्त राजेश पाटील यांनी आयसीयू, ओ टू, व इतर वाॅर्डातील रुग्णांशी संवाद साधला. औषध उपचार, जेवन, त्याचा दर्जा याबाबत विचारणा केली. स्वच्छता गृहाची देखील पाहणी केली. त्यानंतर बाहेर उपस्थित असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधला.

रुग्णांची योग्य प्रकारे उपचार व काळजी करण्यात येत असल्याचा विश्वास नातेवाईकांना दिला. आयुक्तांनी एक तास सर्व बाबींची पाहणी केली, माहिती घेतली. संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.