Pimpri Corona news: आता खासगी रुग्णालयातील उपलब्ध बेडची माहिती मिळणार ‘मी जबाबदार ॲप’वर

एमपीसी न्यूज – कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुरेशी आणि अचूक माहिती नागरिकांना उपलब्ध नसल्याने नागरिक संभ्रमात असतात. त्यामुळे घर बसल्या नागरिकांना मोबाईलद्वारे बेड मॅनेजमेंटसह कोरोना संदर्भातील सर्व माहिती उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने ‘मी जबाबदार’ हे मोबाईल ॲप विकसित केले आहे.

या ॲपमुळे खासगी रुग्णालयातील आयसीयू, व्हेंटिलेटर, आयसोलेशन बेड, ऑक्सिजन बेड, कोविड केअर सेंटर याची अद्यावत माहिती, रुग्णालय, फोन नंबर, स्थळ, गुगल मॅप, समन्वयक यांची माहिती मिळणार आहे.

महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते “मी जबाबदार” ( Me Jababdar PCMC) या मोबाईल ॲपचे लोकार्पण आज (शनिवारी) करण्यात आले.

उपमहापौर हिराबाई घुले, पक्षनेते नामदेव ढाके, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, कार्यकारी अभियंता तथा प्रवक्ता शिरीप पोरेडी, वैद्यकीय अधिकारी तथा वॉर रुमचे समन्वयक डॉ. क्रिस्टोफर झेवियर, संगणक अधिकारी बोरूडे, सुधीर बोराडे आदी उपस्थित होते.

“मी जबाबदार” (Me Jababdar PCMC) या ॲपमुळे नागरिकांना पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील खासगी रुग्णालयातील व्हेंटिलेटर असलेले आयसीयू बेड, आयसीयू बेड, आयसोलेशन बेड, ऑक्सिजन बेड, कोविड केअर सेंटर याची अद्यावत माहिती, रुग्णालय, फोन नंबर, स्थळ, त्याचे गुगल मॅप व संबंधित समन्वयक यासह माहिती मिळणार आहे. जेणेकरून त्या फोन नंबर वरून संबंधित व्यक्ती रुग्णालयाशी संपर्क साधून कोविड रुग्णासाठी बेड विनासायास उपलब्ध करू शकणार आहे.

बेड मॅनेजमेंट हेल्पलाईन व स्वास्थ हेल्पलाईन सुध्दा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. जेणेकरून त्याच्यावरून संबंधितांना थेट फोन लावता येणार आहेत. कोविड टेस्टिंग सेंटरची झोननिहाय फोन नंबरसह यादी उपलब्ध आहे. ज्याच्या वरून प्रत्यक्ष टेस्टिंग सेंटरला फोन करता येणार आहे व माहिती उपलब्ध होणार आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रांची माहिती आहे. जवळील लसीकरण केंद्र कुठे आहे त्याचा गुगल मॅप, फोन नंबर व त्याचे स्थळ यासह संपूर्ण शहरातील लसीकरणाच्या स्थळांची माहिती या ॲपद्वारे नागरिकांना उपलब्ध होणार आहे.

तसेच पिंपरी-चिंचवड महापालिका, राज्य शासन आणि केंद्र शासनाद्वारे ज्या काही सूचना, अधिसूचना जारी होतील. त्या सुध्दा या ॲपद्वारे सगळ्यांना उपलब्ध होणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.