Pimpri Corona News : कोरोनामुळे 294 बालकांनी गमावले पालक, 8 बालके झाली अनाथ

एमपीसी न्यूज – कोरोना महामारीने आई-वडील दगावल्याने शहरातील 294 बालके पोरकी झाली आहेत. आई दगावलेले 41, तर वडील दगावलेले सर्वाधिक 245 बालके आणि आई व वडील दोघेही दगावलेले 8 अनाथ बालके शहरात आहेत. त्या अनाथांना सांभाळण्यासाठी सक्षम नातेवाईक नसल्यास त्यांचे संगोपन जिल्हा समिती करणार आहे.

कोरोनाच्या विळख्यात अनेक कुटुंबे सापडली. दुस-या लाटेत अनेक घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या पाल्यांची काळजी घेणारे कोणीही नसल्याने ती बालके शोषणास बळी पडण्याची शक्यता आहे. तसेच, बाल कामगार, बाल भिक्षेकरी किंवा मानवी तस्करीत सापडण्याचा धोका आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने टास्क फोर्स गठित करण्याचे आदेश सर्व राज्यांना दिले होते.

त्यामुळे राज्य शासनाच्या आदेशावरून पुणे जिल्हा टास्क फोर्स निर्माण करण्यात आला आहे. त्यासाठी महापालिकेने 18 मे रोजी टास्क फोर्सची त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे.

या टास्क फोर्स समितीच्या वतीने कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या 0 ते 18 वयोगटांतील पाल्यांचे सर्वेक्षण केले जात आहे. अनाथ बालकांच्या मदतीसाठी महापालिकेने 8888006666 हा चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक सुरू केला आहे. त्यावर माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात शहरातील विविध भागातील एकूण 256 अनाथ बालकांची माहिती उपलब्ध झाली आहे.

सर्वेक्षणात मृत्यू झालेल्या पालकांची माहिती घेण्याबरोबरच त्या बालकांचीही माहिती गोळा करण्यात येत आहे. ज्यांना काळजी व संरक्षणाची गरज आहे, अशा बालकांची माहिती जिल्हा बाल कल्याण समितीकडे पाठविली जात आहे. समितीचे एक पथक त्या बालकांना भेटून माहिती घेणार आहे.

नातेवाईक सांभाळण्यास असमर्थ असतील तर त्याला शासनाच्या संगोपन केंद्रात दाखल केले जाणार आहे. अशा बालकांना परस्पर दत्तक घेता येणार नाही, असे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.

 अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप म्हणाले, ”कोरोनामुळे आई किंवा वडिलाचा मृत्यू झाल्याने अनाथ झालेल्या बालकांबाबत कोणाला माहिती असल्यास ती पालिकेस कळवावी. 8888006666 हा चाइल्ड हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. त्यामुळे अनाथ बालके सुरक्षित राहून त्यांचे चांगल्या प्रकारे संगोपण होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.