Pimpri Corona news: ‘जम्बो’त रिकाम्या वॉर्डात ऑक्सिजन चालू ठेवला

जम्बो प्रशासनाने हा दावा फेटाळला

एमपीसी न्यूज – ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असताना पिंपरीतील जम्बो कोविड सेंटरमधील बेफिकिरी उघडकीस आली आहे. जिल्हा प्रशासनाने तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन पुरवठ्याच्या केलेल्या ऑडिटमध्ये 58 रुग्णसंख्या असलेल्या मोकळ्या वॉर्डमध्ये रुग्ण नसतानादेखील ऑक्सिजनचा पुरवठा सुरू असल्याची बाब निदर्शनास आली. दरम्यान, जम्बो प्रशासनाने हा दावा फेटाळला असून वॉर्डातील केवळ 2 ते 3 बेडवर ऑक्सिजन पुरवठा सुरू राहिल्याचे सांगितले.

कोरोना रुग्णांवर उपचारासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रासाठी अण्णासाहेब मगर स्टेडियमवर जम्बो सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे. या सेंटरला नेहमीच ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. जिल्हा प्रशासनाने तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर सध्या रुग्णालयांच्या ऑक्सिजन पुरवठ्याचे ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार नेहरूनगर येथील जम्बो सेंटरमधील ऑक्सिजनचे ऑडीट केले. त्यात 58 रुग्णसंख्या असलेल्या मोकळ्या वॉर्डमध्ये रुग्ण नसतानादेखील ऑक्सिजनचा पुरवठा सुरू असल्याची बाब निदर्शनास आली. दरम्यान, जम्बो सेंटरसारख्या जबाबदार ठिकाणी ऑक्सिजनची अशी उधळपट्टी होत असल्याबद्दल जिल्हा प्रशासनाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

याबाबत  ‘जम्बो’चे डॉ. संग्राम कपाले म्हणाले, “जम्बोत अंतर्गत राजकारण चालू आहे. जिल्हा प्रशासनाचे स्कॉड पाहणीसाठी आले, त्यावेळी कोणीतरी मुद्दामहून दोन किंवा तीन बेडचा ऑक्सिजन चालू ठेवला. जेणेकरून ऑक्सिजन वाया घालवत असल्याचे त्यांना आढळून यावे. 14 किंवा 15 टनांच्यावर ऑक्सिजन वाया गेला नाही.

750 रुग्ण असताना 14 टन ऑक्सिजन वाया गेला आहे. ही परिस्थिती चांगली आहे. पूर्ण वॉर्डाचा ऑक्सिजन चालू नव्हता केवळ दोन ते तीन बेडचा ऑक्सिजन चालू होता. 58 बेडचा वॉर्ड असून तो बंद आहे. ऑक्सिजन चालू करण्यासाठीचे फ्लो मीटर तिथे लागले नाहीत. त्यामुळे तेथून ऑक्सिजन बाहेर पडण्याचा विषयच येत नाही”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.