Pimpri corona News: नेहरुनगर जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा

एमपीसी न्यूज – खाटांसाठी रुग्ण प्रतिक्षेवर असताना आता ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. एका पुरवठादाराने अचानक ऑक्सिजनचा पुरविणे बंद केल्याने नेहरुनगर येथील जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजनची कमतरता तयार झाली आहे. उद्यापर्यंत पुरेल एवढाच ऑक्सिजन शिल्लक आहे. परंतु, महापालिका प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करुन ऑक्सिजनची उपलब्धता करत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात मागील दोन महिन्यांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होत आहे. दिवसाला साडेतीन हजाराच्या आसपास नवीन रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे रुग्णालयात दाखल होणा-या रुग्णांचे प्रमाणही जास्त आहे. वाढत्या रुग्णांमध्ये गंभीर, अतिगंभीर रुग्णांचीही संख्या जास्त आहे. अनेक रुग्णांना ऑक्सिजनची गरज लागते. व्हेंटिलेटरवरील रुग्णाला जास्त ऑक्सीजन लागतो.

महापालिकेच्या पाच हॉस्पिटलसाठी दरदिवशी 55 टन ऑक्सिजन लागतो. तर, जम्बो कोविडसाठी ऑक्सिजन 25 टन ऑक्सिजनच्या दैनंदिन पुरवठ्याची आवश्यकता आहे. मात्र, ऑक्सिजनची मागणी आणि पुरवठा यात अंतर पडत आहे.

त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. जम्बो सेंटरसाठी ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या एका पुरवठादाराने अचानक पुरवठा बंद केला. त्यामुळे ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली आहे.

_MPC_DIR_MPU_II

जम्बोमध्ये 600 रुग्ण उपचार घेत आहेत. सायंकाळी विभागीय आयुक्त कार्यालयातून ऑक्सिजनचे तीन टँकर आणले. ऑक्सिजन मिळवण्यासाठी महापालिका अधिका-यांची धावाधाव सुरु आहे.

ऑक्सिजन पुरवठ्याची जबाबदारी असलेल्या उपायुक्त स्मिता झगडे म्हणाल्या, “महापालिकेच्या पाच हॉस्पिटलसाठी दरदिवशी 55 टन ऑक्सिजन लागतो. जम्बो कोविडसाठी 25 टन ऑक्सिजनच्या दैनंदिन पुरवठ्याची आवश्यकता आहे. उर्वरित सर्व ठिकाणी पुरवठा होत आहे. जम्बो सेंटरमध्ये ऑक्सिजनची कमतरता तयार झालेली आहे. कारण, एका पुरवठादाराने अचानक पुरवठा बंद केला. पण, आता ऑक्सिजन उपलब्ध केला जात आहे.

दैनंदिन उपलब्धता युद्धपातळीवर केली जात आहे. राज्य सरकार, जिल्हास्तर आणि एफडीए यांच्या सतत संपर्कात आहोत. ते पण प्रयत्न करत आहेत. मागणी वाढल्याने साठा संपत आला. त्यामुळे जम्बो कोविडसाठी ऑक्सिजनचा पुरवठा करणा-या सप्लार्यसने पुरवठ्यास असमर्थता दाखविली. पण, कुठेही अडथळा येवू दिलेला नाही.

अडथळा येणार नाही याची खबरदारी घेत आहोत. उद्यापर्यंत पुरेल एवढा ऑक्सिजन शिल्लक आहे. फक्त जम्बो रुग्णालयाची समस्या आहे. बाकी कुठेही अडथळा नाही”.

महापालिकेचे प्रवक्ते शिरीष पोरेड्डी म्हणाले, ”व्हेंडर्सकडून ऑक्सिजन उपलब्ध करुन आत्तापर्यंतची मागणी पूर्ण करत आहोत. ऑक्सिजनची कमतरता शहरापुरती मर्यादित नाही. संपूर्ण राज्यभरात ऑक्सिजनची समस्या आहे. परंतु, महापालिका ज्या सोर्सकडून ऑक्सिजन मिळेल तेथून आणून रुग्णांची गरज पुरवित आहे. दररोज ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध करुन घेतला जातो”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.