Pimpri Corona News: पॉझिटीव्ह न्यूज ! एक लाख पिंपरी-चिंचवडकरांची कोरोनावर यशस्वी मात

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात मागील काही दिवसांपासून पुन्हा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असली तरी कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण देखील वाढत आहे. आजपर्यंत शहरातील 1 लाख 5 हजार 281 जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 1 लाख 73 नागरिकांनी कोरोनाला हरविले आहे. कोरोनामुक्तांचे प्रमाण 95 टक्क्यांच्या पुढे आहे. ही मोठी दिलासादायक बाब मानली जात आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 10 मार्च 2020 रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. मार्च, एप्रिल, अर्धा मे महिना परिस्थितीवर महापालिका नियंत्रण ठेवू शकली. रुग्ण संख्या आटोक्यात राहिली.

परंतु, मे महिन्याच्या मध्यानंतर शहरातील रुग्ण संख्या झपाट्याने वाढू लागली. त्यानंतर जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये रुग्णसंख्येत वेगाने वाढ झाली. त्यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये रुग्णसंख्येचा आलेख उतरणीस आला होता. जानेवारी 2021 मध्येही रुग्णसंख्येचे प्रमाण कमी होते. दिवसाला 60 पर्यंत नवीन रुग्ण सापडत होते.

अचानक 10 फेब्रुवारीनंतर पुन्हा शहरातील रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली. दिवसाला तीनशे ते साडेचारशेच्या पटीत नवीन रुग्णांची भर पडायला लागली. त्यामुळे चिंता वाढली असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. वाढत्या रुग्णसंख्येबरोबर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाणही जास्त आहे.

आजपर्यंत शहरातील 1 लाख 5 हजार 281 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील तब्बल 1 लाख 73 जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95 टक्क्यांच्या पुढे आहे. ही दिलासादायक बाब मानली जात आहे.

_MPC_DIR_MPU_II

दरम्यान, शहराची लोकसंख्या सुमारे 25 लाख असून त्यापैकी 1 लाख 5281 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्याचे प्रमाण 4.21 टक्के आहे. शहरातील 1841 लोकांचा मृत्यू झाला असून मृत्यूचा दर 1.74 टक्के आहे. सध्या सव्वा पाच हजाराच्या आसपास सक्रिय रुग्ण आहेत.

महापालिका हद्दीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले – डॉ. साळवे

याबाबत बोलताना महापालिकेचे अतिरिक्त अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे म्हणाले, ”आजपर्यंत 1 लाखापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण महापालिका परिसरात चांगले आहे. कोरोनावरील उपचारासाठी आता लसही उपलब्ध होत आहे. लस आल्याने नागरिक दक्षता घेण्याचे टाळत असल्याचे दिसून येत आहे.

नागरिक सार्वजनिक ठिकाणी गर्दी करत आहेत. मास्क वापरत नाही. हात सॅनिटाईझ केले जात नाहीत. नागरिकांनी अनावश्यकपणे गर्दी करणे टाळावे. अत्यावश्यक बाहेर जायचे असेल. तर, मास्कचा काटेकोरपणे वापर करावा. हात सॅनिटाईझ करावेत. कोणतीही लक्षणे आढळल्यास महापालिकेच्या दवाखान्यात तपासणी करावी.

डॉक्टरांच्या सल्यानुसार उपचार घ्यावेत. लवकरच नागरिकांसाठीही लस उपलब्ध होणार नाही. सरकारच्या मार्गदर्शक सुचनांनुसार लाभार्थ्यांनी लस घ्यावी. आतापर्यंत देशातील अंदाजे दीड कोटी लोकांनी कोरोना लस घेतली आहे. लस सुरक्षित असल्याचे आढळून येत आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.