Pimpri Corona News: संभाव्य तिसरी लाट; बालरोग तज्ज्ञांच्या ‘टास्क फोर्स’चे गठण

एमपीसी न्यूज – कोरोनाची दुसरी लाट स्थिरावत असताना तिसरी लाट येण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. या लाटेत लहान मुलांना जास्त धोका असल्याचेही सांगितले जाते. त्यापार्श्वभूमीवर महापालिकेने उपाययोजना सुरु केल्या आहेत. लहान मुलांचे कोविड 19 वरील उपचार, अतिदक्षता विभाग (आयसीयू) व्यवस्था तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना / मार्गदर्शन / संचलन याबाबत बालरोग तज्ज्ञांची सहा सदस्यसीय टास्क फोर्सचे गठण करण्यात आले आहे.

महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या आदेशानुसार टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली.

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील बालरोग विभागाच्या प्राध्यापिका डॉ. दिपाली अंबिके, डॉ. डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेजच्या बालरोग विभागाचे प्राध्यापक डॉ. शरद अगरखेडकर, आदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटलचे नियो-न्युटोलॉजिस्ट डॉ. राहुल कल्याणपुरकर, युनिक हॉस्पिटलचे नियो-न्युटोलॉजिस्ट डॉ. सुधीर माळवदे, स्टर्लिंग हॉस्पिटलचे बालरोग इटेन्सीव्हीस्ट डॉ. मनोज पाटील आणि बालरोग तज्ज्ञ डॉ. संदीप शिंदे यांचा या टास्क फोर्समध्ये समावेश आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रामध्ये कोविड-19 या संसर्गजन्य रोगाची तिसरी लाट येण्याची शक्यता वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्याबाबतची धोक्याची सूचना दिली आहे. या लाटेत लहान मुले जास्त प्रमाणात बाधित होण्याची शक्यता वर्तविली आहे.

या गंभीर बाबीची तात्काळ दखल घेवून महापालिका हद्दीतील महापालिका, खासगी रुग्णालयातील बालरोग तज्ञ यांना लहान मुलांचे कोविड-19 वरील उपचार व लहान मुलांचे अतिदक्षता विभाग (आयसीयू) व्यवस्था तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना / मार्गदर्शन / संचलन याबाबत करावयाचे कामकाजाबाबत मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.

त्यासाठी महापालिकेने वैद्यकीय तज्ञांची कृतीदल (टास्क फोर्स) गठित केले आहे. महापालिका हद्दीतील महापालिका/ खासगी रुग्णालयातील लहान मुलांसाठी उपचाराबाबतीत कोरोना संसर्गाचे तिसऱ्या लाटेच्या संदर्भात उपाययोजना / मार्गदर्शन / संचलन याबाबत ही समिती मार्गदर्शन करणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.