_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pimpri Corona News : कोरोनामुक्त रुग्णांमध्ये ‘म्युकोरमायकोसिस’ची लक्षणे

वायसीएम रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

एमपीसी न्यूज – कोरोना आजारातून बरे झालेल्या परंतु कोरोना पश्चात रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेल्या मधुमेही रुग्णांना वरच्या जबड्यात आणि वरच्या जबड्याच्यावर असलेल्या हाडांच्या पोकळीत म्हणजे सायनसमध्ये काळसर अशी बुरशी तयार होऊन म्युकोरमायकोसिस या आजाराची लक्षणे आढळून आली आहेत.

प्रसंगी अशा रुग्णांवर जबड्याच्या व जबड्याच्या वरील सायनसच्या शस्त्रक्रिया कराव्या लागत आहेत. कोविडच्या दुसऱ्या लाटेनंतर अशा प्रकारच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात या रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात येत आहे.

रुग्णालयातील कान नाक घसा विभाग आणि दंतरोग विभागांमध्ये अशा रुग्णांवर शस्त्रक्रिया कराव्या लागत आहेत, अशी माहिती दंतरोग विभाग प्रमुख डॉ. यशवंत इंगळे आणि कान नाक घसा विभागप्रमुख डॉ.  अनिकेत लाठी यांनी दिली.

या आजारावरील शस्त्रक्रिया वायसीएम रुग्णालयात डॉ. अनिकेत लाठी, डॉ आदित्य येवलेकर, डॉ.कौस्तुभ कहाणे, डॉ यशवंत इंगळे यांच्या सहकार्याने करण्यात आल्या.

म्युकोरमायकोसिस या आजारामध्ये काळसर अशा बुरशीचा संसर्ग वाढून प्रसंगी डोळ्यापर्यंत आणि मेंदूपर्यंत प्रादुर्भाव होऊ शकतो. हवेतून प्रसार होणारे स्पोअर्स हे नाका तोंडातून शरीरात प्रवेश करतात.

रुग्णाची प्रतिकारशक्ती क्षीण झालेली असेल आणि मधुमेही रुग्णाचे रक्तातील साखरेचे प्रमाण अनियंत्रित असेल अशा रुग्णास कोविड उपचारा दरम्यान अतिप्रमाणात स्टिरॉइड आणि वायरल लोड, सायटोकाइन स्टॉर्म कमी करण्यासाठी रेमडेसीविर सारखे इंजेक्शन द्यावे लागते.यामुळे सिरम आयर्नचा लोड वाढतो.

म्युकोरमायकोसिस ही बुरशी पर्यावरणात नैसर्गिकरित्या अस्तित्वात असते. परंतु, प्रतिकारशक्ती कमी झाल्यानंतर या प्रकारच्या बुरशीचा शरीरामध्ये संसर्ग होतो. श्वासोच्छ्वासावाटे या बुरशीचे कण शरीरात गेल्यानंतर फुप्फुस तसेच वरच्या जबड्यातील सायनसमध्ये आणि वरच्या जबड्यामध्ये दुष्परिणाम होतो, असे डॉक्टरांनी सांगितले.

कोरोना पश्चात मुकोरमायकोसिस आजाराची ‘ही’ आहेत लक्षणे !

#तीव्र डोकेदुःखी, अंगात सतत बारीक ताप

#गालावर सूज किंवा बधिरपणा येणे

_MPC_DIR_MPU_II

#नाक गळणे

#वाचा जबड्यातील हिरड्यांवर पू असलेल्या पुळ्या येणे

#वरच्या जबड्यातील दातांचे हलणे

#जबड्याची टाळू आणि नाकातील त्वचा यांचा रंग काळसर होणे

#वरच्या जबड्याच्या टाळूला किंवा वरच्या भागाला छिद्र पडणे

आजार टाळण्याचे उपाय !

#तोंडामध्ये आणि नाकातील पोकळ्याना सौम्य निर्जंतुकीकरण द्रावणाने धुणे किंवा वॉश देणे.

#मधुमेही रुग्णांना उपचारादरम्यान स्टिरॉइड व इतरइंजेक्शनचा नियंत्रित वापर करणे.

#रोगप्रतिकारशक्ती वर्धक बाबींचा आहारामध्ये समावेश करणे.

# लक्षणे आढळल्यास लवकरात लवकर तज्ज्ञांचा सल्ला घेणे आणि उपचार करणे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.