Pimpri Corona News : ‘गृहविलगीकरणास बंदी’च्या निर्णयाचा फेरविचार करावा : महेश लांडगे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडसह प्रमुख शहरांमधील कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांमध्ये निम्म्याहून अधिक रुग्णांनी गृहविलगीकरणातच उपचार घेतलेले आहेत. गृहविलगीकरणातील लोकांनी कोरोनावर मातही केली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या कमी होत असली तरी गृहविलगीकरण बंदीबाबत घेतलेल्या निर्णयाचा राज्य सरकारने फेरविचार करावा, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली 18 जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी, आरोग्य अधिकारी यांची बैठक झाली. राज्यातील आजची कोरोना स्थिती 3 लाख 27 हजार आहे. कोरोना रिकव्हरी रेट 93 टक्क्यांवर पोहोचला आहे. पॉझिटिव्हीटी रेट 12 टक्क्यांवर खाली आहे. तसेच, मृत्यूदर हा 1.5 टक्क्यांपर्यंत आहे. त्यामुळे ज्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी रेट एकूण राज्याच्या सरारसी पॉझिटीव्हीटी रेटपेक्षा जास्त आहे. त्या जिल्ह्यांमधील होम आयसोलेशन बंद करुन कोविड सेंटर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

या पार्श्वभूमीवर आमदार लांडगे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना ई-मेलद्वारे पत्र पाठवले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवडमध्ये सध्यस्थितीला 500 ते 700 च्या दरम्यान दररोज बाधित रुग्णांची संख्या दिसत आहे. दहा दिवसांचा एकत्रित विचार केला तर बाधित रुग्ण सुमारे 5 ते 7 हजारांच्या घरात राहणार आहेत.

शहरातील बेडची उपलब्धता लक्षात घेता एवढ्या रुग्णांना रुग्णालयांमध्ये उपचार देणे शक्य होणार नाही. अवघ्या 20 दिवसांत रुग्णालयांतील बेड बूक होतील. त्यातच कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याचे मत तज्ज्ञांनी नोंदवले आहे.

याहून म्युकर मायकोसिसच्या रुग्णांचीही संख्या वाढत आहे. त्यामुळे गृह विलगीकरणामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण बऱ्याचअंशी कमी होतो, याचा अनुभव आपल्याला आहे. त्यामुळे गृह विलगीकरणास बंदी घालून काय हाशील होणार आहे? असा सवालही आमदार लांडगे यांनी उपस्थित केला आहे.

रुग्णालयांमध्ये जाण्याबाबत नागरिकांत भिती !

कोरोनाबाधित झालेल्या अनेक रुग्णांना रुग्णालयात जाण्याबाबत भिती वाटते. घरात उपचार घेण्याबाबत रुग्णांचे पहिले प्राधान्य असते. घरी उपचार घेताना काही रुग्ण गंभीर होतात, हे खरे असले तरी गृह विलगीकरण सुविधा बंद करणे हिताचे नाही. पुन्हा कोरोनाची तिसरी लाट येणार असे म्हणले जात आहे.

त्यावेळी आपल्याकडे तितके बेड, आयुसीयू सुविधा, ऑक्सिजन आणि कोरोनामुळे होणारे दुष्परिणाम याबाबत आरोग्य यंत्रणा उभारावी लागणार आहे. सध्यस्थितीला अतिरिक्त कोविड केअर सेंटर सुरु करणे शक्य होईल. पण, त्यासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ आपल्याकडे उपलब्ध नाही. याचाही विचार राज्य सरकारने करावा, अशी भूमिका आमदार लांडगे यांनी मांडली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.