Pimpri Corona News: जम्बो, ‘सीसीसी’मधील मनुष्यबळ, कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक अर्हतेची महापालिका तपासणी करणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने जम्बो, कोविड केअर सेंटरसाठी (सीसीसी) बाह्यस्त्रोतामार्फत मनुष्यबळ उपलब्ध केले आहे. पुरवठादाराकडून करारनाम्यातील अटी व शर्तींची पूर्तता झाली आहे किंवा कसे? आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध आहे का ?, Expression OF interest ‘ईओआय’ प्रमाणे कर्मचाऱ्यांनी शैक्षणिक अर्हता धारण केली आहे का ? याची तपासणी महापालिकेची चार सदस्यीय समिती करणार आहे. तसेच बिले अदा करण्यापूर्वी याची तपासणी केली जाणार आहे.

या तपासणीसाठी महापालिका उपायुक्त मंगेश चितळे, कार्यकारी अभियंता शिरिष पोरेड्डी, आकुर्डी रुग्णालयाच्या ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता साळवे आणि संबंधित क्षेत्रिय कार्यालयाचे क्षेत्रिय अधिकारी अशी चार जणांची समिती गठित केली आहे.

महापालिकेने कोरोनाचा फैलाव कमी करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. जम्बो कोविड केअर सेंटर, सीसीसी सेंटरमध्ये खासगी बाह्यस्त्रोतामार्फत मनुष्यबळ व इतर सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. यासाठी खासगी पुरवठाधारकांसोबत महापालिकेने करारनामा केला आहे.

या करारनाम्यातील तरतुदींनुसार जम्बो कोविड केअर सेंटर, सर्व कोविड केअर सेंटर (सीसीसी) येथे पुरवठाधारकांसोबत करण्यात आलेल्या अटी व शर्तींची पूर्तता झाली आहे किंवा कसे, याची तपासणी करण्यासाठी चार अधिका-यांची समिती गठित केली आहे.

सर्व कोविड केअर सेंटर, जम्बो कोविड सेंटरमध्ये करारनाम्यानुसार मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात आले आहे किंवा कसे, उपलब्ध मनुष्यबळ हे Expression OF interest ‘ईओआय’ प्रमाणे आहे का, पुरवठाधारकांमार्फत नियुक्त करण्यात आलेले मनुष्यबळ ‘ईओआय’ प्रमाणे शैक्षणिक अर्हता धारण करणारे आहे किंवा कसे, ‘ईओआय’ प्रमाणे 24बाय 7 (तीन शिफ्टमध्ये) मनुष्यबळ कार्यरत असते किंवा कसे, याबाबत अचानक तपासणी करण्यात येणार आहे.

मनुष्यबळाव्यतिरिक्त ‘ईओआय’ प्रमाणे मान्य केलेल्या सर्व सोयी-सुविधा पुरवठाधारकांमार्फत पुरविण्यात आल्या आहेत किंवा कसे, याचीही तपासणी केली जाणार आहे. खासगी पुरवठाधारकांची बिले अदा करण्यापूर्वी या बाबींची तपासणी केली जाणार आहे.

या समितीने कामकाजाचा अहवाल आयुक्त, अतिरिक्त व वैद्यकीय विभागास सादर करावा. समितीचा अहवाल विचारात घेऊन सदर खासगी संस्थांची बिले अदा करण्याची कार्यवाही संबंधित विभागांनी करावी, असे परिपत्रकात स्पष्ट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.