Pimpri corona News: रुग्णसंख्या घटली, 4781 बेड उपलब्ध, कोरोनाच्या संकटात दिलासा

एमपीसी न्यूज – मागील काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत आहे. रुग्णसंख्या पाचशेच्या आतमध्ये आली असून हे आशादायक चित्र आहे. नवीन रुग्णांपेक्षा बरे होणा-या रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यातच शहरवासीयांसाठी आणखी एका दिलासादायक बाब समोर आली आहे. पालिका आणि खासगी रुग्णालयातील मिळून 4781 बेड (खाटा) आजमितीला उपलब्ध आहेत. बेड उपलब्धतेचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढले आहे. सरकारी, खासगी रुग्णालयांतही बेड मिळणे सोपे झाले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 10 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. मे पर्यंत कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात होती. जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात कोरोनाने हाहा:कार उडविला होता. रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत होती. मृत्यूचे प्रमाणही वाढले होते. रुग्णांना बेड मिळणे अवघड झाले होते.

त्यामुळे नागरिकांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर पालिकेने बेडची उपलब्धता वाढविण्यासाठी प्रयत्न केले. कोविड केअर सेंटर, खासगी रुग्णालयांमध्ये बेड वाढविले. 7 हजार 811 बेड उपलब्ध झाले आहेत.

पालिकेने 1 सप्टेंबर रोजी कोविड केअर सेंटर, रुग्णालयातील साधे 5 हजार 584 बेडची निर्मिती केली होती. रुग्णसंख्या घटल्याने त्यामध्ये आता कपात करुन पाच हजारांपर्यंत आणली आहे. काही कोविड केअर सेंटर देखील बंद केले जात आहेत. 1 मे रोजी ऑक्सीजनचे 215 बेड उपलब्ध होते. आता 1862 पर्यंत उपलब्धतता वाढली आहे.

व्हेंटिलेटर नसलेल्या आयसीयू बेडच्या उपलब्धततेची 64 संख्येपासून सुरुवात केली होती. आजरोजी 529 बेड उपलब्ध आहेत. व्हेंटिलेटर बेडची 107 पासून सुरुवात केली होती. आता 165 बेड उपलब्ध आहेत. ऑक्सीजन, व्हेंटिलेटर आणि आयसीयू बेडमध्ये वाढ केली. रुग्णसंख्या घटली. तरी त्यात कपात केली नाही. परंतु, कोविड केअर सेंटरमधील बेड कमी केले आहेत.

याबाबत बोलताना अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील म्हणाले, ”शहरातील रुग्णसंख्या कमी झाली आहे. तीन हजारच्या आसपास सक्रिय रुग्ण आहेत. सक्रिय रुग्णांचे प्रमाण 25 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. पालिकेने साधे, ऑक्सीजन, व्हेंटिलेटर, आयसीयू अशी साडेसात हजारापर्यंत बेडची उपलब्ध केली होती. आता बेडची कमतरता नाही. उपलब्धता मोठ्या प्रमाणात आहे.

रुग्णसंख्या घटल्याने कोविड केअर सेंटरमधील बेड कमी केले आहेत. सीसीसी सेंटरमधील रुग्णसंख्या कमी आहे. होम आयसोलेटला पण परवानगी दिली आहे. सीसीसी सेंटर बंद केले जाणार आहेत. आता फक्त तीनच सीसीसी सेंटर चालू ठेवले जाणार आहेत. त्यामध्ये बालेवाडी स्टेडियम, भोसरी, बालनगरीतील आणि चिखली घरकूल येथील सेंटर चालू ठेवण्यात येणार आहे. भविष्यात गरज पडल्यास काही सेंटर चालू करता येवू शकतील”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.