Pimpri Corona News: ‘म्युकरमायकोसिस’चा धोका वाढतोय, शहरात 75 हून अधिक रुग्ण; 12 जणांचा बळी

वेळीच उपचार केल्यास आजार बरा होऊ शकतो

एमपीसी न्यज – कोरोना आजारातून बरे झालेल्यांना ‘म्युकरमायकोसिस’ हा बुरशीजन्य आजार बळावत आहे. या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली. या आजाराचे पिंपरी-चिंचवड शहरात 75 हून अधिक रुग्ण आहेत. तर, ‘म्युकरमायकोसिस’ या दुर्मीळ आजाराने 12 जणांचा बळी घेतला आहे. वायसीएम रुग्णालयात दिवसाला अशा चार रुग्णांवर शस्त्रक्रिया केली जाते. वेळीच उपचार केल्यास आजार बरा होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी लक्षणे दिसताच रुग्णालयात दाखल होणे आवश्यक असल्याचे आवाहन तज्ज्ञांकडून केले जात आहे. कोरोनानंतरचे साईड इफेक्ट, शरीराची कमकूवत रोगप्रतिकारक शक्ती, यामुळे हा आजार होत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरासाठी कोरोनाची दुसरी लाट भयंकर ठरली. या लाटेत प्रचंड रुग्णवाढ झाली. 30 ते 40 या वयोगटातील अनेकांचा कोरोनाने बळी घेतला. अनेक कुटुंबातील कर्ते पुरुष कोरोनाने हिरावून नेले. दुस-या लाटेने मोठे नुकसान केले.

आता ही लाट स्थिरावत असताना या लाटेनंतर नवीन संकट उभे राहिले आहे. कोरोनातून बरे झालेल्या काही रुग्णांमध्ये ‘म्युकरमायकोसिस’ हा बुरशीजन्य आजार बळावत आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेनंतर ‘म्युकरमायकोसिस’च्या रुग्णांची संख्या वाढत आहे.

या आजाराचे शहरात 75 हून अधिक रुग्ण असून दररोज रुग्ण वाढत आहेत. वायसीएम, आदित्य बिर्ला आणि डॉ. डी.वाय पाटील रुग्णालयात या आजाराचे रुग्ण आहेत. वायसीएम रुग्णालयात गुरुवारपर्यंत या आजारामुळे 8 जणांचा तर, खासगी रुग्णालयात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. या आजारामुळे अनेकांना डोळे गमवावे लागत आहेत. हा आजार वेळीच लक्षात आला आणि त्यावर तातडीने उपचार झाले, तर तो बरा होतो.

याबाबत वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठता डॉ. राजेंद्र वाबळे म्हणाले, ”’म्युकरमायकोसिस’ हा बुरशीजन्य रोग आहे. या आजाराने बाधित असलेले सर्व रुग्ण कोरोनाचे आहेत. हे रुग्ण ब-यापैकी मॉडरेट, सिव्हिर होते. त्यांच्यावर झालेले उपचार, गोळ्या -औषधे, उपचाराला दिलेला प्रतिसाद आणि डिस्चार्ज झाल्यानंतरही काही दिवस गोळ्या, औषधे सुरु ठेवावी लागतात. काही गोळ्या दीड महिने सुरु ठेवाव्या लागतात. ही औषधे योग्य पद्धतीने घेतली गेली नसल्यास हा आजार उद्भवतो.

तसेच रक्ताच्या गाठी तयार झाल्यास आणि रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्याने बुरशी डोके वर काढते. शरीरातील कमकुवत झालेल्या भागाला बुरशी लागते. बुरशीचा तोंड, नाकातून शरीरात प्रवेश होतो. शहराचा कमकुवत भाग म्हणजे चेहरा असतो. नाकाच्या बाजुची पोकळी, डोळा कमकुवत असते. त्याच्यातून बुरशी शरीरात जाते. उपचाराचे हे साईट इफेक्ट असतात. मधुमेह असेल तर साखरेचे प्रमाण जास्त झालेले असते. अशा ठिकाणी बुरशी लगेच फैलावते”.

डॉ. वाबळे पुढे सांगतात, ”वायसीएम रुग्णालयात आत्तापर्यंत ‘म्युकरमायकोसिस’चे 50 रुग्ण दाखल झाले होते. त्यातील काही जणांचा डिस्चार्ज झाला आहे. तर आठ जणांचा या आजारामुळे मृत्यू झाला. डोळ्याची खोपणी ओलांडून मेंदूपर्यंत बुरशी गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. लक्षणे ओळखून तत्काळ उपाययोजना केल्या, रुग्णालयात दाखल झाल्यास आजार नियंत्रणात येवू शकतो. लक्षणे असतानाही काही होत नाही म्हणून दुर्लक्ष केल्यास प्राथमिक औषधे घेणा-या व्यक्तींमध्ये याचा जास्त फैलाव होतो. बुरशी मेंदूपर्यंत पोहचते. त्यामुळे मृत्यू होतो”.

”कोरोनातून बरे झाल्यानंतर दिलेली औषधे नियमितपणे घ्यावीत. त्यात खंड पडता कामा नये. सकस आहार घ्यावा. भरपूर प्रमाणात पाणी प्यावे. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती व्यवस्थित राहते. बुरशीला कमकवूत भाग सापडू द्यायचा नाही. हे त्यातून टाळू शकतो. औषधांचे साईड इफेक्ट, शरीराची कमकवूत झालेली प्रतिकार शक्ती यामुळे ‘म्युकरमायकोसिस’ हा आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही”, असेही डॉ. वाबळे यांनी सांगितले.

वायसीएम रुग्णालयाचे दंतरोग विभागाचे प्रमुख डॉ. यशवंत इंगळे म्हणाले, ”वायसीएम रुग्णालयात ‘म्युकरमायकोसिस’चे रुग्ण आहेत. लवकर निदान होण्यासाठी लक्षणे जाणवताच लवकरात-लवकर डॉक्टरांना दाखवावे. कान, नाक, घसा, डोळे, दातांच्या डॉक्टरांना दाखवून तपासणी करावी. निदान झाल्यास घाबरुन न जाता तत्काळ उपचार करावेत. शुगर नियंत्रणात ठेवावी. नाकातोंडावाटे बुरशी फुप्फुसाकडे जावू नये यासाठी सतत मास्क वापरावा. रोगप्रतिकारशक्ती वाढेल असा आहार घ्यावा. ‘म्युकरमायकोसिस’चे रुग्ण वाढण्याचे प्रमाण वाढले आहे. लोकांमध्ये जागरुकता निर्माण होत असून लोक तपासणी करत आहे. वायसीएममध्ये दररोच चार जणांवर शस्त्रक्रिया केल्या जातात”.

कोरोनापश्चात ‘म्युकरमायकोसिस’ आजाराची ‘ही’ आहेत लक्षणे !

#तीव्र डोकेदुःखी, अंगात सतत बारीक ताप असणे

#गालावर सूज किंवा बधिरपणा येणे

#नाक गळणे

#वाचा जबड्यातील हिरड्यांवर पू असलेल्या पुळ्या येणे

#वरच्या जबड्यातील दातांचे हलणे

#जबड्याची टाळू आणि नाकातील त्वचा यांचा रंग काळसर होणे

#वरच्या जबड्याच्या टाळूला किंवा वरच्या भागाला छिद्र पडणे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.