Pimpri Corona News : शहरात मदर चाईल्ड कोविड केअर सेंटर उभारावे – महेश लांडगे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात सध्या दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज वर्तविला जात असून त्यामध्ये लहान मुलांना बाधा होण्याचे प्रमाण जास्त राहील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळे पूर्वकाळजी म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने शहरात मदर चाईल्ड कोविड केअर सेंटर उभारावे, अशी मागणी भाजपाचे शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आमदार लांडगे यांनी आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, देशात सध्यस्थितीला लहान मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लस अद्याप आलेली नाही. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना व 18 वर्षांपर्यंतच्या मुलांना कोरोना धोका जास्त असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका लहान मुलांसाठी कोविड केअर सेंटर उभारणार आहे. त्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड शहरामध्ये लहान मुलांना आईसोबत कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेता येतील, असे सेंटर उभारण्यात यावे.

त्यासाठी आवश्यक असलेले बालरोग तज्ञ यांची भरती प्रक्रिया राबवावी. ज्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्यापूर्वीच सर्व तयारी करणे उचित ठरणार आहे. सध्यस्थितीला कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठी राज्य व केंद्र सरकार आपआपल्या परिने प्रयत्न करीत आहे.

पण, 18 वयोगटाखालील मुलांना अद्याप कोरोना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नाही. 1 ते 9 वर्षांच्या मुलांना विविध लस दिल्या असल्याने त्यांची रोगप्रतिकारशक्ती जास्त असते. पण त्या तुलनेत 10 ते 18 वयोगटातील मुलांची प्रतिकारशक्ती कमी होते. त्यांना कोरोना प्रतिबंधक लसही देता येत नाही.

पालकांमध्ये जनजागृती करावी…

महापालिका प्रशासनाने लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग झाल्यास पालकांनी काय काळजी घ्यावी, याबाबत जनजागृती करणे अपेक्षीत आहे. लहान मुलांना सौम्य लक्षणे असणाऱ्यांना घरीच विलगीकरणात ठेवल्यास रुग्णांना नेमके कधी रुग्णालयात हलवावे. ज्यामुळे वेळीच योग्य ते उपचार मिळून त्यांचे प्राण वाचू शकतील याबाबत सल्ला द्यावा. त्यासाठी एक स्वतंत्र नियंत्रण कक्ष निर्माण करण्यात यावा.

या नियंत्रण कक्षात ज्येष्ठ बालरोगतज्ञ व वैद्यकिय समुपदेशकांना रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांच्या संपर्काची जबाबदारी देण्यात यावी. लहान मुलांना कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी पालकांनी काय खबरदारी घ्यावी? लहान मुलांना कोरोनाची झाल्यास काय करावे ? लहान मुलं मास्क वापरत नसल्याने पालकांनी कशी काळजी घ्यावी? या व अशा इतर अनेक मुद्दयांबाबत तज्ञांच्या सल्ल्याने मार्गदर्शनपर सूचना तयार करुन त्याबाबत जनजागृती करावी, अशी मागणीही आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.