Pimpri Corona News: ‘जम्बो’तील रुग्णांसोबत व्हिडीओ कॉलद्वारे नातेवाईकांना संवाद साधता येणार

महापौर, आयुक्तांनी व्हिडीओ कॉलद्वारे कोरोनाबाधित रुग्णांशी साधला संवाद

एमपीसी न्यूज – कोरोना रुग्णांना उपचार करण्याबरोबरच त्यांचे मनोधर्य वाढवून मानसिक स्वास्थ्य मजबूत होण्यासाठी महापालिकेने नेहरुनगर येथील जम्बो कोविड केअर सेंटरमधील रुग्णांशी व्हिडीओ कॉलद्वारे नातेवाईकांना संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे रुग्ण तंदुस्त होण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

तीन व्यक्तीच्या पथकाद्वारे हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. प्रथम कोरोनाबाधित रुग्णाजवळ जावून त्यांची नातेवाईकांशी बोलण्याची इच्छा विचारात घेतली जाणार आहे. त्यानंतर लॅपटॉपमार्फत रुग्णांचे थेट चित्रीकरण रुग्णांच्या नातेवाईकांस त्यांच्या मोबाईलवर दिसणार आहे. त्यामुळे त्यांना एकमेकांशी लाईव्ह संवाद साधणे शक्य होणार आहे.

कोरोना बाधित रुग्णांशी आज महापौर उषा ढोरे, उपमहापौर हिराबाई घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, राजेश पाटील यांनी व्हिडीओ व्हॉट्सऍप व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला.

महापौर ढोरे म्हणाल्या, कोविड रुग्णालयात दाखल असणाऱ्या रुग्णांना त्यांचा आप्तेष्टांशी संपर्क होत नसल्यामुळे नैराश्य येण्याची शक्यता असते. ते नैराश्य दूर करण्यासाठी कुटुंबियांशी व्हिडीओ कॉलींगद्वारे संवाद साधल्यामुळे उर्जा निर्माण होवून रुग्ण बरा होण्यास मदत होते. ही बाब लक्षात घेवून हा उपक्रम नेहरुनगर येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे या आजारातून कोविड रुग्ण लवकरात लवकर बरे होतील, असा आशावाद महापौर ढोरे यांनी व्यक्त केला.

आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या संकल्पनेतून कोरोना रुग्णांचा नातेवाईकांशी संवाद हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचे नियोजन सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.