Pimpri Corona News: ‘रिचार्ज टु डिस्चार्ज’ उपक्रमातून वाढतेय कोरोना बाधितांचे मनोधैर्य

महापालिकेच्या ॲटो क्लस्टर व जम्बो रुग्णालयात गेल्या पंधरा दिवसांपासुन उपक्रम सुरु

एमपीसी न्यूज – कोरोना रुग्ण रुग्णालयामध्ये दाखल झाल्यानंतर ते अक्षरश: एकटे पडतात. त्यामुळे त्यांना एकटेपणाची भावना निर्माण झाल्याने ते घाबरुन जातात. रुग्ण घाबरुन गेल्यामुळे त्यांच्यावर कितीही चांगले वैद्यकीय उपचार केले तरी ते उपचाराला योग्य असा प्रतिसाद देत नाहीत. अशा वेळी या रुग्णांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या ॲटो क्लस्टर व जम्बो रुग्णालयात शिवप्रसाद महाले लाईफ कोच, नाशिक यांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेला “रिचार्ज टु डिस्चार्ज” हा उपक्रम प्रभावी ठरत आहे.

याबाबतची माहिती महापौर उषा ढोरे, उपमहापौर हिराबाई घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांनी दिली.

महापालिकेच्या ॲटो क्लस्टर व जम्बो रुग्णालयात गेल्या पंधरा दिवसांपासून हा दैनंदिन उपक्रम सुरु करण्यात आला असून सकाळी 10 ते 12 ॲटो क्लस्टर व सायंकाळी 4 ते 6 या वेळेत जम्बो रुग्णालयात समुपदेशन सुरु आहे. यामध्ये रुग्णांशी प्रत्यक्ष चर्चा करुन त्यांना जाणवणारा एकटेपणा दूर करण्याचा प्रयत्न महाले करीत आहेत.

“रिचार्ज टु डिस्चार्ज” या उपक्रमाद्वारे शिवप्रसाद महाले हे रुग्णांशी प्रत्यक्ष आयसीयू व ऑक्सिजन बेडच्या जवळ जावून रुग्णांबरोबर थेट संवाद साधत आहेत. याद्वारे रुग्णांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी त्यांचे समुपदेशन करणे, सामुहिक म्युझीकल एक्झरसाईज करुन घेणे, रुग्णांकडून मेडीटेशन करुन घेणे इ. उपक्रम राबविले जात आहेत.

या उपक्रमाबद्दल रुग्णांशी थेट संवाद साधला असता रुग्णांनी त्यांच्यामध्ये कमालीच्या सुधारणा झाल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावेळेस रुग्णांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करुन आपल्या जवळची व्यक्ती आपल्याला भेटायला आली, अशा प्रकारच्या भावना व्यक्त करुन महापालिकेचे व लाईफ कोच यांचे आभार मानले आहेत. एकुणच या उपक्रमामुळे रुग्णांचे कोरोना मुक्त होण्याचे प्रमाण वाढण्यास मदत झालेली आहे.

या उपक्रमाबाबत महाले म्हणाले, कोरोनाच्या पहिल्या लाटेत मालेगाव (जि. नाशिक) येथील रुग्णालयांमध्ये हा उपक्रम राबविला. त्यामध्ये डॉक्टर व रुग्णांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यानंतर ॲटो क्लस्टर व जम्बो रुग्णालयात गेल्या पंधरा दिवसापासून हा उपक्रम सुरु केला असून त्याला रुग्णांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. याबरोबरच रुग्णांमध्ये सकारात्मक बदल होत असल्याचे समाधान वाटत आहे. खरोखरच या उपक्रमातून रुग्ण मानसिक व शारीरिकरित्या रिचार्ज होवून डिस्चार्ज होत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.