Pimpri: शहरात पुढील 12 दिवस कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याची शक्यता -श्रावण हर्डीकर

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूच्या आजाराचे रुग्णांची संख्या वाढण्याचे प्रमाण 7 दिवसात दुप्पट असे धरल्यास केवळ 37 दिवसांत 16 पट रुग्णांची संख्या होऊ शकते. रुग्णवाढीची गती कमी करणे गरजेचे आहे. शहरात केलेल्या लॉकडाऊनमुळे आपण ही दुपटीची गती रोखण्यात यशस्वी झालो आहोत. सध्या पिंपरी-चिंचवड शहरात पुढील 12 ‍दिवस कोरोनाचे रूग्ण दुप्पट होण्याची शक्यता आढळून येत आहे, अशी भीती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केली. हे रोखण्यासाठी या आजाराचा प्रसार कसा होतो ते माहीत होणे गरजेचे आहे. यासाठी आवश्यक प्रयत्न करणे आवश्यक असून इतरांपासून अंतर ठेवणे, हाताची स्वच्छता ठेवणे, सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

कोरोनासोबत जगताना या उपक्रमाअंतर्गत शहरातील नागरीकांबरोबर आज (मंगळवारी) फेसबुक लाईव्ह द्वारे त्यांनी हा संवाद साधला.

कोरोनामुळे आपले जीवन बदलले आहे. या बदलणा-या जीवनाला आत्मसात करायचे असेल. तर, आपल्याला कोरोना सोबत जगण शिकले पाहिजे असे सांगत आयुक्त हर्डीकर म्हणाले, आज आपण 100 पॉझिटीव्ह रुग्णांचा टप्पा पार केला आहे. तर, 31 रुग्ण बरे करून घरी सोडण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विविध उपायोजना केलेल्या आहेत. रुग्ण बरे करण्यासाठी आपले वैद्यकीय पथक चांगल्या सेवा देत आहे.

शहरातील तीन जणांचा तर पुण्यातील एका महिलेचा मृत्यू झालेला आहे. पण त्याचे कारण त्यांची रोगप्रतीकारक शक्ती कमी असणे, त्यांना किडणीचा त्रास असणे ही आहेत. त्यामुळे ज्यांना असे आजार आहेत त्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. 80 टक्के लोक जे या आजाराचे ‘कॅरीअर’ आहेत हे कळाले नाही. तर, तुम्ही विषाणूग्रस्त होऊ शकता आणि जर योग्य काळजी घेतली नाही. तर आपणास रूग्ण ठेवायला जागा शिल्लक राहणार नाही असेही आयुक्त हर्डीकर म्हणाले. कोरोना सोबत जगतांना आपल्याला पुढे जाण्याची सवय लावावी लागेल आणि स्वत:चे संरक्षण स्वत: करण्यासाठी घरातच राहून नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले.

महापौर उषा ढोरे म्हणाल्या, कोरोना या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी उंबरा न ओलांडता त्याला उंबऱ्याबाहेरच ठेवण्याची दक्षता घ्यावी. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी व रोखण्यासाठी डॉक्टर, अधिकारी, कर्मचारी, सफाई कर्मचारी यांच्यापासून सर्वजण आटोकाट प्रयत्न करीत आहेत. तथापि नागरिकांनीही दिलेल्या सूचनांचे पालन करून संसर्ग टाळण्यासाठी प्रयत्न करावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.