Pimpri : ‘वायसीएम’मध्ये फक्त कोरोनाबाधितांवर उपचार; अन्य रुग्णांवर डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचाराची सोय

एमपीसी न्यूज – डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र पिंपरी व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय यांच्यात नुकत्याच झालेल्या सामंजस्य करारानुसार आता यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील नॉन कोविड ( इतर रुग्णांवर ) रुग्णांवर डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय उपचार करणार आहेत.

महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार वायसीएम रुग्णालयात आता फक्त कोरोना बाधितांवर उपचार केले जाणार आहेत. त्यामुळे वायसीएममधील इतर रुग्णांच्या उपचारांबाबत निर्णय घेणे फार महत्त्वाचे होते. त्या अनुषंगाने डॉ. डी. वाय. पाटील विद्यपीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्याशी संवाद साधण्यात आला. यावेळी सकारात्मक चर्चा झाली. त्यानुसार यापुढे डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय हे इतर आजारावरील रुग्णांवर उपचार करणार आहेत, अशी माहिती अधिष्ठाता, पदव्युत्तर संस्था यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, पिंपरीचे डॉ. राजेंद्र वाबळे यांनी दिली.

कोरोना बाधितांसाठी शासकीय यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे. त्या अनुषंगाने सध्याच्या घडीला इतरही आजार असलेल्या रुग्णांवर उपचार करणेही तितकेच गरजेचे आहे. रुग्णांचे आरोग्यहित पाहता त्यांना सर्वोतोपरी उपचार देण्यास आमचे रुग्णालय कटिबद्ध असल्याचे मत कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी व्यक्त केले.

दरम्यान, या कराराच्या आदान प्रदान प्रसंगी वायसीएमचे अधिष्ठाता, डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. राजेंद्र वाबळे, रुग्णालय अधिष्ठाता डॉ. जे. एस. भवाळकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. एच. एच. चव्हाण आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.