Pimpri : पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढून 16 वर, पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र आकडा 12 वर स्थिर

एमपीसी न्यूज – पुण्यात राज्यात पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला. त्यानंतर ती संख्या वाढतच आहे. कोरोनाबाधित आणखी एक रुग्ण आढळून आल्याने पुणे शहरातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 16 पर्यंत वाढली आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांत पिंपरी-चिंचवडमध्ये एकही नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही, ही पिंपरी-चिंचवडकरांसाठी थोडा दिलासा देणारी बाब म्हणावी लागेल. 

पुण्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्येही वेळोवेळी कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत पिंपरी-चिंचवडने पुण्याला मागे टाकले होते. काही दिवस राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीत पिंपरी-चिंचवड प्रथम क्रमांकावर होते. मात्र गेल्या दोन दिवसांत पिंपरी-चिंचवडमध्ये नवीन एकही कोरोनाबाधिताची भर न पडल्याने आकडा 12 वर स्थिरावलेला आहे. या सर्व रुग्णांवर उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

पुणे आणि मुंबई शहरात मोठ्या संख्येने रुग्ण वाढल्याने मुंबईने आकडेवारीत प्रथम क्रमांकावर तर पुणे शहर दुसऱ्या क्रमांकावर गेले आहे. पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 16 झाली आहे. पुण्यात एक कोरोनाबाधित रुग्ण अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर असून उर्वरित 15 रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

परदेशातून येणारी सर्व विमाने आता सात दिवसांसाठी बंद करण्यात आल्यामुळे परदेशातून येणाऱ्या प्रवाशांचा ओघ थांबला आहे. आता देशांतर्गत कोरोनाचा संसर्ग थांबविण्याचे मोठे आवाहन भारतापुढे आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांनी क्वारंटाईनमध्ये राहण्याचे काटेकोर पालन करावे. लॉकडाऊन असल्याने कोणीही घराबाहेर पडू नये. शासनाने व महापालिका प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. कोरोनाचा पूर्ण बंदोबस्त होईपर्यंत सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.