Pimpri : कोरोनाचा युवकांना विळखा ; शहरातील 1 हजार युवक पॉझिटिव्ह

Corona teases the youth; 1 thousand youth positive in the city

एमपीसी न्यूज – कोरोनाचा सर्वाधिक धोका लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना असला तरी, कोरोनाची लागण होण्याचे सर्वाधिक प्रमाण युवकांना आहे. कोरोनाने युवकांना अशरक्ष: विळखा घातला आहे. आजपर्यंत पिंपरी-चिंचवड शहरातील तब्बल 1003 युवकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे युवक वर्गामध्ये चिंता आणि भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, आजपर्यंत शहरातील 2550 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा कहर सुरु आहे. संपूर्ण शहराला कोरोनाने विळखा घातला आहे. मागील काही दिवसांपासून दिवसाला 100हून अधिक नवीन रुग्णांची वाढ होत आहे. त्यात युवकांमध्ये कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. अनेक युवकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत नाहीत. केवळ रिपोर्ट पॉझिटीव्ह येत आहेत. पण, युवकांना लागण झाल्याचे निष्पन्न होत आहे हे चांगले आहे. कारण त्यांच्यावर वेळीच उपचार करणे शक्य होते. अन्यथा युवक कोरोना वाहक होऊ शकतात, असे महापालिका प्रशासनाकडून सांगितले जाते.

कोणत्या वयोगटातील कितीजणांना कोरोनाची बाधा ?

आत्तापर्यंत 22 ते 39 वयवर्ष असलेल्या शहरातील 1003 युवकांना कोरोनाची लागण झाली आहे. हे सर्वाधिक प्रमाण आहे. त्याखालोखाल 40 ते 59 वयवर्ष असलेल्यांना लागण होण्याचे प्रमाण आहे. या वयोगटातील 661 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर 13 ते 21 वयवर्ष असलेल्या 320 तरुणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 0 ते 12 वयवर्ष असलेल्या 276 लहान मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. याशिवाय 60 वर्षापुढील 287 वृद्धांना आजपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले झाले आहे.

आजपर्यंत 2550 जणांना लागण !

10 मार्च ते 27 जून दरम्यान पिंपरी-चिंचवड शहरातील 2550 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 1489 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, 43 जणांचा मृत्यू झाला आहे. आजमितीला 1018 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी 886 रुग्णांमध्ये कोरोनाची काहीच लक्षणे नाहीत. केवळ त्यांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आहेत. तर, 98 रुग्णांमध्ये लक्षणे असून 33 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.