Pimpri: ‘वायसीएमएच’मध्ये उद्यापासून कोरोनाची चाचणी; दिवसाला 376 नमुने तपासण्याची क्षमता

Corona test at YCMH from tomorrow; Ability to check 376 samples per day:वायसीएमएच'मध्ये उद्यापासून कोरोनाची चाचणी; दिवसाला 376 नमुने तपासण्याची क्षमता

दोन तासात 96 स्वॅबची तपासणी; रिपोर्ट तत्काळ येण्यास होणार मदत

आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे लॅब कार्यान्वित

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात स्वतंत्र कोविड लॅब सुरु झाली आहे. ‘आयसीएमआर’च्या मान्यतेने उद्यापासून (शुक्रवार) वायसीएममध्ये ‘स्वॅब’ तपासणी केली जाणार आहे. आरटीपीसीआर टेस्टिंग युनिटची क्षमता दिवसाला 376 आहे. सुरुवातीला 20 ते 40 स्वॅबची तपासणी होईल. काही दिवसांनी पूर्ण क्षमेतेने तपासणी चालू होईल. त्यानंतर दोन तासात 96 स्वॅबची तपासणी होईल. यामुळे रिपोर्ट प्रलंबित राहण्याचे प्रमाण घटेल, असे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे लॅब कार्यान्वित झाली आहे. यामुळे कोरोना आजाराची लक्षणे असणा-या व्यक्तींची चाचणी लवकर करणे सोपे होईल.

प्रादुर्भाव रोखण्यास मदत होणार आहे. मुंबई आणि ठाणे महापालिकांबरोबरच पिंपरी-चिंचवड महापालिकेलाही लॅब सुरु करण्याचा बहुमान मिळाला आहे. राज्यातील ही तिसरीच महापालिका ठरली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. शहरातील रुग्ण संख्या साडेतीन हजारावर जाऊन पोहचली आहे.

शहरातील कोरोना संशयितांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्था (एनआयव्ही),  भोसरीतील राष्ट्रीय एड्‌स संशोधन संस्था (नारी), आयसीएमआर, आयसर, हायरोकेअर, कृष्णा,  मेट्रो पोलीस, आदित्य बिर्ला आणि डॉ. डी. वाय. पाटील मधील लॅबकडे रिपोर्ट तपासणीसाठी पाठविले जात आहेत.

एनआयव्हीवर ताण आहे. तर, नारीसह काही खासगी लॅबची क्षमता कमी आहे. यामुळे रिपोर्ट प्रलंबित राहत आहेत. रिपोर्ट येण्यास दोन दिवसांचा कालावधी लागतो.

त्यामुळे महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात स्वतंत्र कोविड लॅब सुरु करण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी प्रयत्न केले.

त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. आरटीपीसीआर प्रणालीत रुग्णाच्या घशातील स्त्राव प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला जातो. विषाणूमध्ये आरएनए (रायबोन्यूलिक अ‍ॅसिड) आहे. त्या आधारावर ‘रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेड पॉलिमरेज चेन रिअ‍ॅक्शन’मध्ये (आरटी – पीसीआर) नेमका कोणता विषाणू आहे, हे ओळखता येतो. त्यासाठी पाच ते सहा तासांचा कालावधी लागतो.

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात सुरु करण्यात आलेल्या प्रयोगशाळेसाठी कंत्राटी तत्त्वावरील 12  पॅथॉलॉजिस्ट रुजू झाले आहेत. एकावेळी 90 ते 92 नमुने तपासणी करता येईल, अशी अद्ययावत यंत्रणा आहे.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ”महापालिकेने वायसीएम रुग्णालयात स्वतंत्र कोविड लॅब सुरु केली. त्याला आयसीएमआरने देखील मान्यता मिळाली आहे.  उद्यापासून (शुक्रवार) स्वॅब तपासणीस सुरुवात  केली जाणार आहे. आरटीपीसीआर टेस्टिंग युनिटची 376 स्वॅबची तपासणी करण्याची क्षमता आहे.

पण, सुरुवातीला तेवढे करु शकणार नाही. त्यासाठी मनुष्यबळाचे प्रशिक्षण झाले पाहिजे. कर्मचारी प्रशिक्षित झाल्यानंतर चाचण्यांची संख्या वाढेल. सद्यस्थितीत 20 ते 40 स्वॅबची तपासणीस सुरुवात होईल. त्यासाठी  24 लॅब टेक्निशची भरती केली आहे.

मायक्रोबायलॉजी आणि पॅथॉलॉजी दोनही विभागांचे प्रशिक्षण करुन घेतले आहे. त्यांच्यामार्फत चाचण्या सुरु करत आहोत. या लॅबचे समन्वयक म्हणून पॅथॉलॉजिस्ट तुषार पाटील आणि मायक्रोबायोलॉजिस्ट नितीन मोकाशी यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

संपूर्ण मनुष्यबळ प्रशिक्षित झाल्यानंतर दोन तासात 96 स्वॅबची तपासणी होईल. दहा दिवसानंतर पूर्ण क्षमतेने चाचण्या सुरु होतील. त्यानंतर दिवसाला 376 चाचण्या होतील. रिपोर्ट तत्काळ येतील.  शिवाय मनुष्यबळ उपलब्ध झाल्यास ही लॅब दोन ते तीन शिफ्टमध्ये देखील चालवणे शक्य आहे.

यामुळे स्वॅब चाचणी अहवाल अगदी काही तासात मिळण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.  रिपोर्ट प्रलंबित राहणार नाहीत. रुग्णांवर लवकर उपचार करण्यास सोपे जाणार आहे. तसेच एनआयव्ही, नारीसह खासगी लॅबमध्येही तपासणी केली जाणार आहे. चाचण्या वाढविण्यात येणार आहेत, असेही आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.

वायसीएममध्ये होणार ‘आरटीपीसीआर’ चाचणी

सध्या कोरोना आजाराच्या निदानासाठी दोन चाचण्यांचा वापर केला जाते. पहिली चाचणी मॉलिक्युटर टेस्ट आहे. ही चाचणी विषाणूमधील जनुकीय पदार्थ ओळखते.

या चाचणीमुळे जो रुग्ण सध्या कोरोनाबाधित आहे, त्याची माहिती आपल्याला मिळते. या चाचणीसाठी संशयित रुग्णाच्या नाक, घसा स्राव तपासणीसाठी पाठवतो. या चाचणीला ‘आरटीपीसीआर’ म्हटले जाते.

दुस-या चाचणीला सिरॉलॉजिकल टेस्ट म्हणतात. कोणत्याही व्यक्तीला संसर्गजन्य आजार होतो. तेव्हा त्या व्यक्तीच्या रक्तामध्ये शरीरात प्रवेश केलेल्या सूक्ष्मजीवाविरुद्ध प्रतिपिंडे तयार होतात.

सिरॉलॉजिकल चाचण्यांद्नारे व्यक्तीच्या रक्तातील अँटीबॉडीचा शोध घेतो. यासाठी संशयित व्यक्तीच्या रक्तद्रवाची तपासणी केली जाते. वायसीएम रुग्णालयात ‘आरटीपीसीआर’ चाचणी केली जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.