Pimpri Corona Update : चिंता वाढली! कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्ह रेट काही दिवसांतच 5 टक्क्यांवरुन 23 टक्क्यांवर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात मागील काही दिवसांपासून कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला आहे. शहराचा पॉझिटिव्ह रेट काही दिवसांतच 5 टक्क्यांवरून 23 टक्यांपर्यंत गेला असून ही चिंतेची बाब असल्याचे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले. नागरिकांनी नियमांचे पालन केले नाही. तर, भविष्यात लॉकडाऊनची परिस्थिती होऊ शकते, अशी भितीही त्यांनी व्यक्त केली.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. गेल्या आठ दिवसांमध्ये पॉझिटिव्ही रेट 5 ते 6 टक्के होता. तो 11 टक्क्यांवर गेला आणि आता 23 टक्क्यांपर्यंत पॉझिटिव्ह रेट गेला आहे. ही बाब आपल्या सर्वांसाठी चिंतेची आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांच्या सहकार्याची मोठी गरज आहे. मास्कचा वापर करावा, वारंवार हात सॅनिटायझ करावेत. कोरोनाची लक्षणे असलेल्यांना आयसोलेट करावे.

लस आणि कोरोना आपल्यातून गेल्याची मानसिकता लोकांमध्ये झाली आहे. त्यामुळे आपण बिनधास्त झालो आहोत. सभा, सभारंभ, हॉटेल, लग्नांमध्ये मोठ्या संख्येने लोक एकत्र येतात. अशा ठिकाणी कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता जास्त असते. अशा परिस्थितीत नागरिकांनी नियमांचे पालन केले नाही. तर, भविष्यात लॉकडाऊनची परिस्थिती होऊ शकते.

मास्कचा वापर करावा. हात वारंवार धुत रहावे अशी काळजी घेत जबाबदारीने वागावे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. घाबरुन न जाता जबाबदारी समजून वागावे. नियमांचे पालन करावे. मार्केट, शॉपमध्ये गर्दी करु नये. सुरक्षित अंतराचे पालन करावे, असे आवाहन आयुक्त पाटील यांनी केले.

दरम्यान, आजपर्यंत शहरातील 1 लाख 3421 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 98 हजार 362 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1831 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 772 अशा 2603 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.