Pimpri Corona Update : उद्योगनगरीत पुन्हा कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; शहराच्या सर्वच भागात अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

आठ दिवसात दोन हजार नवीन रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत कोरोनाचा विळखा पुन्हा घट्ट होताना दिसून येत आहे. शहराच्या सर्वच भागात दररोज अ‍ॅक्टीव्ह रुग्ण सापडत आहेत. आठही क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत दररोज नवीन रुग्णांची भर पडत आहे. मागील आठ दिवसात शहरात तब्बल 2073 नवीन रुग्णांची भर पडली आहे. परिणामी, पॉझिटीव्ह रेट देखील 30 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

मागीलवर्षी राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण पिंपरी-चिंचवड शहरात आढळला होता. 10 मार्च रोजी एकाचदिवशी तीन रुग्ण सापडले होते. त्यानंतर शहरातील रुग्णसंख्येत प्रचंड वेगाने वाढ झाली. शहरात कोरोनाने हाहा:कार माजविला होता. आता पुन्हा 2021 मध्ये शहरातील रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. 10 फेब्रुवारीपर्यंत शहरातील रुग्णसंख्येचा दर कमी होता. 60 ते 70 च्या आसपास दिवसाला नवीन रुग्ण सापडत होते.

_MPC_DIR_MPU_II

10 फेब्रुवारीपासून शहरातील रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे. दिवसाला दीडशेच्यापुढे नवीन रुग्णांची नोंद होत आहे. काल एकाचदिवशी 425 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. शहरातील सर्वच भागात अ‍ॅक्टीव्ह रुग्ण सापडत आहेत. मागील आठ दिवसात रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. 17 फेब्रुवारी 235 रुग्ण, 18 – 185, 19 – 283, 20 – 207, 21 – 298, 22 – 236, 23 – 204 आणि 24 फेब्रुवारीला 425 अशा 2073 नवीन रुग्णांची मागील आठ दिवसात नोंद झाली आहे.

महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत दररोज अ‍ॅक्टीव्ह रुग्ण सापडत आहेत. त्यामध्ये ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या वाकड, पिंपळेनिलख, पिंपळेसौदागर, पिंपळेगुरव भागात सर्वाधिक रुग्ण सापडताना दिसून येत आहेत. बुधवारी ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत 41, ‘ब’ 62, ‘क’ 48, ‘ड’ 100, ‘इ’ 44, ‘फ’ 52, ‘ग’ 49 आणि ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत 29 अशा 425 रुग्णांची एकाचदिवशी नोंद झाली आहे. शहराच्या भागात रुग्ण वाढत असल्याने चिंता वाढली आहे.

दरम्यान, शहरात आजपर्यंत 1 लाख 4050 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 99 हजार 53 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1833 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रुग्णालयात उपचार घेणार्‍या 772 अशा 2605 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजपर्यंत वैद्यकिय क्षेत्रातील 20 हजार 646 जणांनी लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.