Pimpri Corona Update: स्वॅबची तपासणी तीन दिवस वेटिंगवर; क्वारंटाईन रुग्णांमध्ये संसर्गाचा धोका

Pimpri Corona Update: Swab check on three days waiting; Risk of infection in quarantine patients

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात संशयित नागरिकांच्या स्वॅबची तपासणी सुरु आहे. मात्र, तपासणीला पाठविलेल्या स्वॅबचा तपासणी अहवाल येण्यास तीन ते चार दिवसांचा कालावधी लागत आहे. परिणामी, स्वॅब तपासणी पाठविलेल्या नागिरकांमध्ये संसर्गाचा धोका बळावत असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे.

तसेच अहवाल येईपर्यंत सर्वच नागरिकांना क्वारंटाईन करावे लागत असल्यामुळे प्रत्येकी दररोज पाचशे रुपये खर्चाचा बोजाही महापालिकेवर पडत आहे.

गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत मोठ्याप्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे. रुग्ण संख्या अचानक वाढल्याने महापालिकेतर्फे या रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाचा शोध घेऊन त्यांच्या स्वॅबची तपासणी करण्यात येत आहे.

त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शहरातून दररोज सुमारे पाचशे नागरिकांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले जात आहे.

राष्ट्रीय विषाणू संस्था (एनआयव्ही), नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट (नारी) या संस्थांकडे हे स्वॅब तपासणीसाठी पाठविले जातात. यात नारी संस्थेची स्वॅब तपासणीची क्षमता अवघी 25 ते 30 आहे.

तर, एनआयव्हीमध्ये शहरातील दोनशे ते अडीचशे स्वॅबचीच तपासणी होत आहे. त्यामुळे उर्वरीत स्वॅबच्या तपासणीसाठी तीन ते चार दिवसांचा कालावधी लागत आहे. सध्या दररोज अडीचशे ते तीनशे स्वॅबची तपासणी वेटिंगवर पडत आहे.

ज्या वेळी नागरिकांचा स्वॅब तपासणीसाठी गोळा करण्यात येतो. तेव्हापासून त्यांच्या स्वॅब तपासणीचा अहवाल येईपर्यंत या नागरिकांना महापालिकेने उभारलेल्या केंद्रात क्वारंटाईन करण्यात येते.

अहवाल लवकर प्राप्त होत नसल्याने या सर्व नागरिकांना तीन ते चार दिवस एकाच ठिकाणी राहावे लागते. या सर्व प्रकारात एखादा नागरिक पॉझिटिव्ह असेल तर, इतर नागरिकांना त्याच्या बरोबर राहिल्याने संसर्गाचा धोका वाढत आहे.

स्वॅब तपासणीला गेलेल्या नागरिकांना महापालिकेच्या केंद्रात ठेवले जाते. स्वॅब तपसाणीचा अहवाल येईपर्यंत या नागरिकांचा मुक्काम येथेच असतो.

या नागरिकांना दोन वेळेचे जेवण, नाश्ता, नवीन बेडशिट तसेच इतर साहित्य महापालिकेकडून पुरविले जाते.

एका व्यक्तीचा दोन वेळच्या जेवणाचा दिवसाचा खर्च अडीचशे रुपये एवढा आहे. इतर खर्च मिळून एका व्यक्तीला दररोज सुमारे पाचशे रुपये खर्च येतो. हा खर्च महापालिका करते.

मात्र, स्वॅब तपासणी अहवाल येण्यास तीन ते चार दिवस लागत असल्यामुळे नागरिकांना तेवढे दिवस क्वारंटाईन करावे लागत आहे. त्यामुळे महापालिकेवर या खर्चाचा बोजा वाढत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.