Pimpri : झोपडपट्टी कोरोनापासून सुरक्षित आहे का?

एमपीसी न्यूज (प्रमोद यादव) – कोरोना विषाणू सर्व जगात धुमाकूळ घालत आहे. आर्थिक महासत्ता व वैद्यकीय सेवेत परिपूर्ण असणाऱ्या देशांनी सुद्धा कोरोनापुढे गुडघे टेकले आहेत. भारतात कोरोनाने हळूहळू शिरकाव केला आणि आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 857 च्या घरात जाऊन पोहचली तर महाराष्ट्रात तो आकडा 159 झाला आहे. कोरोनापासून बचाव करायचा असेल तर नियमित साबणाने किंवा हॅन्डवॉशने हात स्वच्छ धुतले पाहिजेत, सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब केला पाहिजे, पौष्टीक आहार आणि मुबलक स्वछ पाणी उपलब्ध असले पाहिजे. लोकांचा सार्वजनिक ठिकाणचा वावर कमी करण्यासाठीं सरकारने संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू केला.  पण शहरी भागात झोपडपट्टीत सगळ्यात जास्त लोकवस्ती राहते तो भाग किती सुरक्षित आहे, असा प्रश्न उपस्थित होतो. 

कोरोनापासून बचाव करण्यासाठी सरकार सर्व प्रयत्न करत आहे. अनावश्यक गर्दी टाळता येणे शक्य न झाल्याने शेवटी लॉकडाऊन चा पर्याय निवडण्यात आला. लॉकडाऊन चा निर्णय योग्यच असला तरी झोपडपट्टी परिसरात त्याचा किती अवलंब होत आहे हे पडताळून पाहणे गरजेचे आहे. फक्त मुंबईच नाही तर पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात खूप झोपडपट्टी असून येथे मोठ्या प्रमाणावर लोक राहतात. या ठिकाणी सुरक्षा म्हणून लोक काय काळजी घेत आहेत हे जवळून पहिले तर फार गंभीर आणि चिंतेत टाकणारे चित्र आहे.

 

अगोदरच समस्यांनी ग्रासलेला हा भाग कोरोनामुळे आणखीच असुरक्षित झाला आहे. सरकार जिथे सोशल डिस्टन्सिंग अवलंब करा, असे सांगत आहे तिथे अगोदरच रहदारीसाठी अपुऱ्या असणाऱ्या जागेत प्रत्येकापासून एक मीटरचे अंतर राखणे कसे शक्य होणार आहे. मर्यादित जागेच्या खोलीत अलगीकरण करून कसे राहणार, असा प्रश्न आहे. हात स्वछ धुण्यासाठी साबण, हॅन्डवॉश किंवा सॅनिटायझर या बरोबर मुबलक पाणी सुद्धा गरजेचे आहे ते या भागात उपलब्ध होत नसताना यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

 

झोपडपट्टीत राहणारे हे बऱ्यापैकी मजूर व हातावर पोट असणारे लोक राहतात सलग 21 दिवसांच्या लॉकडाऊनमुळे या मजूर लोकांवर आणि त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. शाळा बंद असल्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांना मिळणारे मध्यान्न भोजन बंद झाले आहे त्यामुळे या मुलांचा अतिरिक्त ताण त्यांच्यावर पडत आहे. रोजगार बंद झाल्याने अन्नधान्य बाहेरून विकत आणण्यासाठी पुरेसे पैसे उपलब्ध होत नाहीत. काही स्वयंसेवी संस्था जे पुरवतात त्याने दोनवेळच्या पोटाचा प्रश्न सुटतो पण इतर वेळी काय करायचे असा प्रश्न पडतो.

 

सार्वजनिक स्वच्छतागृह व त्या ठिकाणी होणारी वर्दळ आणि अस्वच्छता ही सुद्धा झोपडपट्टीत जास्त भेडसावणारी एक मोठी समस्या आहे. झोपडपट्टीतील अपुऱ्या जागेतील जास्त लोकांची घनता आणि या कोरोनासारख्या आजारासाठी गरजेचे असणारे सोशल डिस्टन्सिंगचा या भागात अवलंब होणे शक्य वाटत नाही . लहान मुले आणि वयोवृद्ध योग्य काळजी येथे घेतली जाणार आहे का, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. सांडपाणी व नाले यांचा योग्य निचरा होत नसल्याने येथे लोकांची आजारी पडण्याची शक्यता दाट आहे.

 

कोरोनासारख्या आजाराच्या पार्श्ववभूमीवर झोपडपट्टी भागात काही उपाय योजना तातडीने करणे गरजेचे आहे. दाट लोकसंख्येच्या या भागात वेळोवेळी औषध फवारणी व निर्जंतुकीकरण करणे गरजेचे आहे. तसेच स्वच्छ मुबलक पाणी उपलब्ध करून देणे. स्वच्छतागृहांची निगा राखली पाहिजे. या लोकांना सोशल डिस्टन्सिंगचे महत्त्व समजावून सांगितले पाहिजे, अनावश्यक गर्दी टाळली पाहिजे हे समजावून सांगितले पाहिजे. हात स्वछ करण्यासाठी सॅनिटायझर उपलब्ध करणे. शक्य झाल्यास ज्या स्टेडियम आणि शाळा महाविद्यालये बंद आहेत तिथे यातील काहींना थोड्या दिवसासाठी स्थलांतरीत करणे आणि त्यांच्या जेवणाची सोय करणे. तसेच काही परप्रांतीय मजूर शहरात अडकून पडले आहेत व काही ठिकाणी एकत्र येऊन उगाचच गर्दी करत आहेत.लत्यांना सुद्धा काही दिवस अशा मोकळ्या जागेत स्थलांतरीत करावे.

 

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वेळीच पाऊले उचलून या ठिकाणी योग्य उपाय योजना करणे गरजेचे आहे. कोरोना विषाणूचा कम्युनिटी ट्रान्समिशनचा धोका वेळीच ओळखायला हवा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.