Pimpri: पोलीस व्यवस्थेपुढे हतबल झालेल्या ‘कोरोना योद्धा’ परिचारिकेने अखेर दिला आत्मदहनाचा इशारा

लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक, कारवाई करण्यास पोलिसांची टाळाटाळ, कर्जाचा डोंगर आणि रुग्णालयातील कामाचा ताण असह्य झाल्याने टोकाचा निर्णय

0

एमपीसी न्यूज – घर देतो म्हणून खरेदी खत करूनही लाखो रुपयांची फसणवूक केल्याच्या प्रकरणी दोषी व्यक्तींवर कारवाई करण्यास पोलीस व्यवस्था टाळाटाळ करीत असल्याने हतबल झालेल्या एका ‘कोरोना योद्धा’ परिचारिकेने अखेर आत्मदहनाचा इशारा दिला आहे. पोलीस चौकीपासून पोलीस आयुक्तालयापर्यंत वारंवार उंबरे झिजवूनही सुरू असलेली टोलवाटोलवी, डोक्यावरील कर्जाचा मोठा डोंगर त्यात कोरोना महामारीमुळे रुग्णालयातील कामाचा ताण असह्य झाल्याने आपण हा टोकाचा निर्णय घेत असल्याचे या परिचारिकेने म्हटले आहे.

निशिगंधा शशांक अमोलिक असे या 52 वर्षीय पीडित महिलेचे नाव आहे. त्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करतात. कोरोना महामारीच्या काळात रुग्णालयात ‘कोरोना योद्धा’ म्हणूनही त्या जबाबदारी सांभाळत आहेत. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई व गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांच्या कार्यालयात जाऊन त्यांनी निवेदन दिले असून त्यात आत्मदहनाचा इशारा दिला आहे. तहसीदार आणि जिल्हाधिकारी यांनाही त्यांनी हेच निवेदन पाठविले आहे.

खरेदीखतानंतर घर नावावर होऊनही तीन व्यक्तींनी संगनमताने त्यांना एक वर्ष झाले तरी ताबा मिळू न देता अमोलिक यांची तब्बल 56 लाखांची आर्थिक फसवणूक केली आहे. कर्ज काढून त्यांनी ही रक्कम दिलेली असल्याने डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला असून दरमहा तब्बल 40 हजार रुपयांचा हप्ता भरताना त्यांना आवाक्याबाहेरचा आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. एवढे करूनही घराचा ताबा मिळत नसल्याने प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. पोलीस चौकीपासून पोलीस आयुक्त कार्यालयापर्यंत पाठपुरावा करूनही त्यांना कोठूनही मदत मिळाली नाही. तुम्हीच जाऊन घराचा ताबा घ्या, हे दिवाणी प्रकरण आहे, कोर्टात जाऊन ऑर्डर आणा, अशा प्रकारची उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यांची बोळवण करण्यात येत असल्याने त्या हताश झाल्या आहेत.

कोरोना विषाणूशी लढू शकते, मात्र अपप्रवृत्तीशी लढताना अपयशी – निशिगंधा अमोलिक

डोळ्यांना दिसत नसलेल्या कोरोना विषाणूच्या विरोधात मी गेले काही महिने लढा देत आहे, पण गेले वर्षभर माझ्या आणि पोलिसांच्याही डोळ्यांना दिसत असलेल्या आरोपींशी लढा देण्यात मात्र मी पूर्णपणे अपयशी ठरले आहे, अशी खंत बोलून दाखवताना अमोलिक यांना अक्षरशः रडू कोसळले. कोरोना योद्धा म्हणून आम्ही समाजासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करतो, आणि आम्हाला आमचा हक्क मिळवून, न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस खाते सहकार्य करणार नसेल, तर जगून काहीही उपयोग नाही, असे हताश उद्गार त्यांच्या तोंडून बाहेर पडले.

अमोलिक यांनी निवेदनात म्हटले आहे की, एक जुलै 2019, साधारणतः एक वर्षापूर्वी काळेवाडी परिसरात राहणाऱ्या आजी श्रीमती वसुंधरा वसंत भोसले यांच्याकडून रितसर खरेदी खत करून पावणेदोन गुंठे क्षेत्रफळ असलेले बैठे घर विकत घेतले. त्यासाठी एजंट म्हणून डॉ. तेजस ढेंगळे यांनी मध्यस्थ म्हणून काम पाहिले. या कामी मी जीआयसी फायनान्स लिमिटेड या वित्तसंस्थेचे गृहकर्ज काढले व भोसले आजी यांना एकूण 56 लाख रुपये धनादेशाद्वारे दिले आहेत.

घर घेतेवेळी डॉ. ढेंगळे यांनी आजींच्या कुटुंबात केवळ त्यांच्या घटस्फोटीत मुलगा हा एकमेव सदस्य असल्याचे सांगितले.  घटस्फोट झाल्याने सून त्यांच्याबरोबर राहात नाही. त्याचबरोबर आजींना घराची किंमत मिळाल्यानंतर त्यांची राहण्याची पर्यायी व्यवस्था होईपर्यंत त्यांना एक महिना याच घरात राहू द्यावे, त्याबदल्यात मी 25 हजार भाडे देण्याची हमी देतो, असे डॉ. ढेंगळे यांनी तोंडी सांगितले होते. महिन्यानंतर डॉ. ढेंगळे यांनी त्यांच्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये भोसले आजी व त्यांच्या मुलाला नेऊन ठेवले आणि त्यांची घटस्फोटीत सून डेझी नरेंद्र भोसले हिला मी घेतलेल्या घरात आणून ठेवले, असे अमोलिक यांनी सांगितले.

कर्जाचा हप्ता तब्बल 40 हजार रुपये

‘अशा पद्धतीने मला अंधारात ठेवून, काहीही कल्पना न देता, त्या सूनबाईस तेथे राहू दिले. मला हे समजल्यानंतर मी याबाबत विचारले असता, काही एक बोलण्यास नकार दिला. सूनबाई डेझी नरेंद्र भोसले यांच्याकडे ताबा मागण्यास गेले असता, तिने मला 25 लाख रुपये मागितले, अन्यथा मी ताबा देणार नाही, असे सांगितले. गेली एक वर्ष ती या घरामध्ये अनधिकृतपणे राहात आहे. मी गृहवित्त संस्थेचा दरमहा 40 हजार रुपयांचा हप्ता भरत आहे. परंतु मला एक रुपयाही भाडे न देता डेझी भोसले तिथे अनधिकृतपणे राहात आहे, असा आरोप अमोलिक यांनी केला आहे.

या संदर्भात मी काळेवाडी पोलीस चौकीत, थेरगाव चौकी, वाकड पोलीस ठाणे, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय येथे जाऊन वारंवार कैफियत मांडण्याचा प्रयत्न केला. माहिती अधिकार कार्यकर्ते व महाराष्ट्र भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप नाईक यांच्या कानावर हा प्रकार घातला. त्यांनीही काही पोलीस अधिकाऱ्यांशी बोलून आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या परीने मदत केली. ‘एमपीसी न्यूज’ने देखील या अन्यायाला सर्वप्रथम वाचा फोडली. त्यानंतरही पोलीस यंत्रणेने या प्रकरणाची गंभीर दखल न घेतल्याने आपण निराश झालो आहोत, अशी व्यथा अमोलिक यांनी मांडली आहे.

एवढे प्रयत्न करूनही न्याय मिळत नसल्याने आपण भयंकर वैफल्यग्रस्त अवस्थेत जगत आहे. माझी घोर फसवणूक झाली आहे. मला समाजात तोंड दाखवायला जागा शिल्लक राहिलेली नाही. समाजातील कुत्सित नजरा, कोरोना महामारीमुळे दवाखान्यातील कामाचा ताण, घरातील व्यक्तींचे टोमणे यामुळे मी हैराण झाले आहे. त्यामुळे मी टोकाचा निर्णय घेतला आहे. तुमच्या कार्यालयासमोर आत्मदहन करून मी माझे जीवन संपविण्याचे ठरविले आहे, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

‘मृत्यूस ‘यांना’ जबाबदार धरावे’

या निवेदनात त्यांनी त्यांच्या मृत्यूस श्रीमती वसुंधरा वसंत भोसले (रा. द्वारा डॉ. तेजराज ढेंगळे, साई प्राईड, ढेंगळे कॉर्नर, मेन रोड, विजयनगर, काळेवाडी), डेझी नरेंद्र भोसले (रा. स. नं. 100/02, गणेश कॉलनी, विजयनगर, काळेवाडी) व डॉ. तेजराज ढेंगळे (रासाई प्राईड, ढेंगळे कॉर्नर, मेन रोड, विजयनगर, श्री हॉस्पिटलजवळ, काळेवाडी) यांना जबाबदार धरण्यात यावे. या तिघांनी संगनमताने आपली मोठी आर्थिक फसवणूक करून जगणे मुश्कील केले आहे. त्यासाठी आपल्या मृत्यूनंतर तरी त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, असे अमोलिक यांनी निवेदनात शेवटी म्हटले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार – प्रदीप नाईक

कोरोना योद्धा असणाऱ्या निशिगंधा अमोलिक यांच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांना न्याय मिळेपर्यंत बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा माहिती अधिकार कार्यकर्ते व महाराष्ट्र भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप नाईक यांनी दिला आहे. या प्रकरणात अमोलिक यांची सरळसरळ आर्थिक फसवणूक झालेली असताना, हे दिवाणी प्रकरण असल्याचे भासवून पोलीस हात झटकू शकत नाहीत. या भूमिकेमुळे अशा प्रकारे सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या ‘रॅकेट’ला ताकद  देण्याचे काम पोलीस करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. डॉ. तेजराज ढेंगळे हा या सर्व प्रकरणाचा सूत्रधार असून तो खरोखरच डॉक्टर आहे का, याचीही सखोल चौकशी केली जावी, अशी मागणी नाईक यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल  देशमुख यांनाही समक्ष भेटून या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून एका कोरोना योद्धा महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी साकडे घालणार असल्याचे नाईक यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like