Pimpri: शहरात कोरोनाचा कहर; आनंदनगरमधील 17 जणांसह 22 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह; उच्चांकी रुग्णसंख्या

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा कहर सुरुच आहे. चिंचवड आनंदनगर झोपडपट्टीतील 17 रुग्णांसह 22 जणांचे रिपोर्ट आज (सोमवारी) पॉझिटीव्ह आले आहेत. आजपर्यंतची ही पहिली उच्चांकी रुग्णसंख्या आहे. यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 86 वर पोहचली आहे. तर, आजपर्यंत शहरातील 225 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

महापालिकेने कोरोना संशयितांचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविले होते. त्याचे दोन रिपोर्ट आत्ता आले आहेत. दोनही रिपोर्टमध्ये 22 जण पॉझिटीव्ह आले आहेत. त्यापैकी चिंचवड आनंदनगर झोपडपट्टीतील 17 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.  याशिवाय भाटनगर, भोसरी आळंदी रोडचा एक आणि येरवड्यातील एका रुग्णाचेही रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहे.

एकाच दिवशी 22 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. या पॉझिटीव्ह रुग्णांवर महापालिकेच्या वायसीएम आणि भोसरी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

महापालिका रुग्णालयात सक्रिय 86 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, पिंपरी-चिंचवड शहरातील 225 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. 125 जणांनी आत्तापर्यंत कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

दरम्यान, 12 एप्रिल रोजी थेरगाव भागातील एका पुरुषाचा, 20 एप्रिल रोजी निगडीतील एका महिलेचा आणि पुण्यातील रहिवाशी पण वायसीएममध्ये दाखल असलेल्या एका महिलेचा आणि  24 एप्रिल रोजी  निगडीतील एका पुरुष रुग्णाचा, 29 एप्रिल रोजी खडकीतील एका महिलेचा, 6 मे रोजी पुण्यातील शिवाजीनगर येथील महिलेचा आणि येरवडा येथील एका महिलेचा  वायसीएम रुग्णालयात,  भोसरीतील पुरुष रुग्णाचा 10 मे रोजी, 11 मे रोजी पुण्यातील वायसीएममध्ये उपचार घेत असलेल्या पुरुष रुग्णाचा आणि आज 15 मे रोजी पुण्यातील वायसीएममध्ये उपचार घेत असलेल्या तिघांचा अशा 12 जणांचा कोरोनामुळे आजपर्यंत मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.