Pimpri: कोरोनाचे रिपोर्ट येण्यास होतोय विलंब, महापालिकेने लॅब उभारावी; सत्ताधा-यांची सूचना

Corona's report is delayed, the municipality should set up a lab; Suggestions from the authorities

एमपीसी न्यूज –  कोरोना संशयित रूग्णांना रूग्णालयात दाखल केल्यानंतर तपासणीचे रिपोर्ट येण्यास दोन दिवस लागतात.  तपासणी रिपोर्ट लवकर येणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिकेने स्वंतत्र यंत्रणा किंवा लॅब उभारावी, अशी सूचना सत्ताधा-यांनी आयुक्तांना केली आहे.

आयुक्त दालनात आज (मंगळवारी) झालेल्या बैठकीला महापौर उषा ढोरे, भाजपाचे शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे, चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे, नगरसेवक विलास मडिगेरी, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड शहर रेडझोनमधून बाहेर पडल्यानंतर शहरातील लॉकडाऊन थिथिल केला आहे. त्यामुळे बाजारपेठ खुली झाली आहे. गेल्या चार दिवसात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढली आहे.

दिवसाला पाचशे संशयितांचे रिपोर्ट तपासणीसाठी पुण्यातील एनआयव्ही आणि पिंपरी-चिंचवड शहरातील नारी संस्थेत पाठविले जात आहेत. मात्र, रिपोर्ट येण्यास दोन ते चार दिवसांचा कालखंड लागत आहे.

संशयितांना क्वारंटाईन करण्यापासून  रूग्णालयात दाखल करण्यापर्यंतची जबाबदारी महापालिका उचलत आहे. या कालखंडात पॉझिटिव्ह असणा-या आणि रिपोर्ट न आलेला एखादा व्यक्ती अधिक काळ क्वारंटाईन राहिला तर प्रसार अधिक होऊ शकतो.

अन्य लॅबशी संपर्क साधून रिपोर्ट लवकर येण्यासाठी आयुक्तांनी प्रयत्न करावेत – नामदेव ढाके

”संशयित रूग्णांना दाखल केल्यानंतर त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने एनआयव्हीकडे तपासण्यास पाठवावे लागतात. सध्या एनआयव्हीवर अधिक ताण आहे. त्यामुळे रिपोर्ट येण्यास दोन ते तीन दिवसांचा उशीर होत आहे.

रिपोर्ट येईपर्यंत संशयितांना क्वारंटाईनच करावे लागते. त्यांचा खर्च महापालिका उचलत आहे.  संशयित म्हणून दाखल झालेली व्यक्ती पॉझिटिव्ह की निगेटिव्ह रिपोर्ट आल्यानंतरच समजते.

पॉझिटिव्ह व्यक्ती अधिक काळ संशयित रूग्णाबरोबर राहिल्यास रोगाचा प्रसार अधिक होऊ शकतो. त्यावेळी आपण यंत्रणा उभारावी. तसेच तातडीने अन्य लॅबशी संपर्क साधून रिपोर्ट लवकर कसे येतील यासाठी आयुक्तांनी प्रयत्न करावेत” अशा सूचना दिल्या असल्याचे सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.