Pimpri : ‘कोरोना’ची दहशत; गुढीपाडव्यानिमित्त स्वीटमार्टमधील ‘रेडिमेड’ पदार्थांची जागा घेतली ‘पारंपरिक’ गोडव्याने

एमपीसी न्यूज – आधुनिकतेची ओढ लागलेल्या शहरांमध्ये पारंपरिक पदार्थ आणि त्याची लज्जत कमी होत आहे. अलीकडच्या काळात स्वीट मार्टमधून रेडिमेड श्रीखंड, आम्रखंड, चक्का, रसमलाई असे गोड पदार्थ आणून त्यावर ताव मारून सण साजरे केले जातात. मात्र, ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर देशभर लागलेल्या संचारबंदीमुळे स्वीट मार्ट देखील बंद आहेत. त्यामुळे गुढीपाडव्याच्या सणानिमित्त घरोघरी पुरणपोळी आणि अन्य पारंपरिक पदार्थ बनवून सण गोड करावा लागला आहे.

गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात. गुढीपाडवा म्हणजे हर्ष, आनंद, उत्साह आणि नाविण्याची सुरुवात. ही सुरुवात गोड होण्यासाठी घरोघरी अट्टाहास केला जातो. चक्का आणायचा किंवा घरी तयार करायचा. त्यात साखर घालून सणाच्या दिवशी त्याचे श्रीखंड, आम्रखंड बनवून पुरीसोबत ताव मारायचा. हा प्रकार मागील काही वर्षापर्यंत सुरू होता. ही संधी सुद्धा यावर्षीच्या गुढीपाडव्याला साधता आली नाही.

सध्या स्वीटमार्टचा काळ आला असून त्यात ही पारंपरिकता हरपली आहे. अलीकडे हा सगळा अट्टाहास न करता सरळ स्वीटमार्टमध्ये जायचं, आवडेल तो गोड पदार्थ आणायचा आणि पुरोसोबत ताव मारायचा, ही ‘शॉर्ट बट स्वीट’ सोय अलीकडे केली जाते.

_PDL_ART_BTF

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवार) पासून 21 दिवस संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे केवळ जीवनावश्यक वस्तू आणि सेवा सुरू राहिल्या. स्वीटमार्ट बंद असल्यामुळे नागरिकांनी पुरणपोळी, शिरा, खीर असे घरात बनवता येतील असेच पदार्थ बनवून गुढीपाडवा साजरा केला.

बाजारात सर्वकाही रेडिमेड मिळत असल्याने अनेकजण अथवा अनेकजणी पदार्थ बनवायला शिकण्याचा अट्टाहास करीतच नाहीत. कोरोना विषाणूने अशांची चांगलीच फजिती केली आहे. बाहेर काही मिळत नाही आणि बनवायला काही येत नाही, त्यामुळे मोडकं-तोडकं काहीतरी, कसंतरी बनवून खाण्यास अनेकांनी पसंती दिली. तर अनेक जणांनी या फंद्यात न पडता सरळ रोजच्या मेनूला नाईलाजाने पसंती दिली.

नववर्षाची खरेदी, बाहेर फिरायला जाणं, एकमेकांना गाठीचे हार देऊन शुभेच्छा देणं या सगळ्याच गोष्टी यावर्षी कोरोनाच्या भीतीमुळे रद्द कराव्या लागल्या आहेत. कोरोना कुणाच्या आनंदावर कसे विरजण घालेल ते सांगता येत नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.