Pimpri: पिंपरीकरांनो, घाबरू नका; तुमच्या सुरक्षेसाठी आम्ही सज्ज – संदीप वाघेरे

एमपीसी न्यूज – ‘कोरोना’ विषाणू संसर्गाच्या भितीमुळे नागरिकांनी घाबरुन न जाता खबरदारी घ्यावी. आम्ही तुमच्या सुरक्षेसाठी 24 तास सज्ज आहोत, असा विश्वास भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी पिंपरीवासीयांना दिला आहे. प्रभागात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला. तसेच  प्रभागात औषध फवारणी आणि धूर फवारणी करून घेतली.

‘कोरोना’ विषाणूचा प्रसार पाहता या विषाणूला प्रतिबंध घालणे महत्वाचे आहे. यासाठी विषाणूमुळे होणार्‍या आजाराच्या प्रतिबंध व उपचारांबाबत सर्वसामान्यामध्ये जनजागृती करण्यासाठी नगरसेवक वाघेरे यांनी पुढाकार घेतला आहे. पिंपरी प्रभागातील शिंदे आळी, वैभवनगर, बालामन चाळ, वाघेरे आळी, कुदळे कॉलनी 4, वाघेरे कॉलनीसह प्रभागातील विविध लोकवस्ती, कॉलनी, सोसायट्यांमध्ये दररोज औषध फवारणी करण्यात येत आहे.

नगरसेवक वाघेरे म्हणाले, कोरोनापासून बचाव करण्यासाठी खबरदारी बाळगणे हाच मुख्य उपाय आहे. नागरिकांनी खोकताना, शिंकताना नाका तोंडावर रुमाल ठेवावा. दिवसातून किमान चार ते पाच वेळा हात साबणाने स्वच्छ धुवावेत. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. एकमेकांशी बोलतांना अंतर ठेवून बोलावे. श्वसनावाटे विषाणूंचा प्रसार शक्य असल्याने खबरदारी म्हणून मास्क, हॅण्डग्लोव्हजचा वापर करावा. त्यामुळे विषाणूजन्य आजारांपासून बचाव करता येईल. लवकरच या आजाराचा आपण मिळून नायनाट करू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.