Pimpri: अण्णासाहेब मगर स्टेडिअममध्ये पालिका उभारणार दोन हजार बेडचे ‘सीसीसी’ सेंटर

Pimpri: Corporation to set up 2,000-bed 'CCC' center at Annasaheb Magar Stadium भविष्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता पालिकेने सीसीसी सेंटर वाढविण्यावर भर दिला आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या, जुलैअखेरपर्यंत 24 हजार रुग्ण होण्याचा अंदाज घेऊन पालिकेकडून कोविड केअर सेंटर (सीसीसी) वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडिममध्ये कोरोना काळजी केंद्र तयार करण्यात येणार आहे. त्याची क्षमता दोन हजार बेडची असणार आहे. यासाठी एमईपी सिस्टिम सोल्यूशन्स यांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा विळखा घट्ट झाला आहे. शहरातील रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शहरातील रुग्णसंख्या नऊ हजारांच्या उंबरठ्यावर आहे. जुलैअखेरपर्यंत रुग्णसंख्या 24 हजार होईल असा कयास आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा आहे.

त्यामध्ये लक्षणेविरहित रुग्णांची संख्या जास्त असतील. घरी आयसोलेट होणे शक्य नसलेल्या लक्षणे विहरित रुग्णांवर ‘सीसीसी’ सेंटरमध्ये उपचार केले जात आहेत.

भविष्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता पालिकेने सीसीसी सेंटर वाढविण्यावर भर दिला आहे. दहा हजार रुग्णांची सोय होईल, एवढे सीसीसी सेंटर उभारण्याचे पालिकेचे नियोजन आहे. सध्या शहरात 11 ठिकाणी सीसीसी सेंटर कार्यान्वित आहेत.

नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडिममध्ये कोरोना काळजी केंद्र उभारण्यात येणार आहे. स्टेडियमची जागा तब्बल सव्वा पाच एकर आहे. त्यावर काळजी केंद्र उभारण्यात येणार आहे. दोन हजार बेड करण्याचे नियोजन केले आहे. त्याच्या विद्युत कामासाठी एमईपी सिस्टीम सोल्यूशन्सला सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे.

रूग्णालयासाठी विद्युतीकरण करणे, जनरेटर बसविणे, अग्निप्रतिबंधक यंत्रणा, पाण्याचे पंप, वॉटर हिटर, वॉटर प्युरिफायर, अंतर्गत सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे अशा कामासांठी सल्लागाराची नियुक्ती केली आहे.

या कामाच्या मोबदल्यात सल्लागारास केवळ एक रूपया मानधन दिले जाणार आहे. त्याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने बुधवारी (दि.15) आयत्यावेळी मान्यता दिली आहे.

सद्यस्थितीत कार्यरत असलेले कोविड केअर सेंटर!

# पिंपरी-चिंचवड कॉलेज आफ इंजिनिअरींग, आकुर्डी
# रिजनल टेलिकॉम सेंटर, शाहुनगर
# किवळेतील सिम्बॉयोसिस कॉलेज
# डी. वाय. पाटील मुलींचे वसतिगृह, आकुर्डी
# डी. वाय. पाटील आयुर्वेदीक कॉलेज, संत तुकारामनगर, पिंपरी
# मोशीतील आदिवासी विभाग मुलांचे व मुलींचे वसतिगृह
# बालाजी युनिव्हर्सिटी, लॉ कॉलेज
# ताथवडे येथील इंदिरा कॉलेज
# बालेवाडी वसतिगृह
# मोशीतील सामाजिक न्याय विभागाचे मुलांचे व मुलींचे वसतिगृह
# म्हाडा वसाहत, म्हाळूंगे, चाकण

सद्यस्थितीत पालिकेचे हे 11 कोविड केअर सेंटर चालू आहेत. चिखलीतील घरकुलमध्ये देखील एक सेंटर करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.