Pimpri: ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’साठी पालिका घेणार डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेजच्या MBBS विद्यार्थ्यांची मदत

Corporation will take help of MBBS students of DYPatil Medical College for 'Contact Tracing' : विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये मानधन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णसेवेकरिता वैद्यकीय अधिका-यांची कमतरता भासत आहे. त्यासाठी पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज येथील ‘एमबीबीस’चे शिक्षण घेत असलेल्या 27 विद्यार्थ्यांची ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’च्या कामासाठी मदत घेण्यात येणार आहे. त्यांना दरमहा दहा हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता युद्धपातळीवर कामकाज करण्यात येत आहे.

पिंपरी-चिंचवड पालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रसार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. शहरातील रुग्णसंख्या 12 हजार 931 वर पोहोचली आहे.

रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. पालिकेमध्ये कार्यरत असलेले व करार पद्धतीने नियुक्त केलेले वैद्यकीय अधिकारी हे कोरोना बाधित झालेल्या रुग्णांचे सेवेकरिता पुरेशा प्रमाणात नाही.

त्यामुळे पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील मेडीकल कॉलेजमध्ये एबीबीएसचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार आहे.  ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’च्या कामकाजाकरिता 27 विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार आहे.

या विद्यार्थ्यांनी क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रीय अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली कामकाज करायचे आहे.

निगडी भेळ चौकातील ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयासाठी 3,  चिंचवड  येथील ‘ब’ कार्यालयाकरिता 5,  नेहरुनगरमधील ‘क’ 4, रहाटणीतील ‘ड’ 3, निगडीतील ‘फ’ कार्यालयासाठी 5, थेरगाव गावठाणातील ‘ग’ 3 आणि कासारवाडातील ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयासाठी 4 विद्यार्थी देण्यात आले आहेत.

विद्यार्थ्यांनी अप्रामाणिकतायुक्त गैरवर्तन कृत्य केल्यावर त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थान कायद्याअंतर्गत शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.

सर्व क्षेत्रीय अधिका-यांनी विद्यार्थ्यांची माहिक हजेरी वैद्यकीय विभागप्रमुखांकडे आवश्यक त्या कार्यवाहीसाठी सादर करावी. या विद्यार्थ्यांना दरमहा दहा हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे.

वैद्यकीय विभागामार्फत ते अदा करण्यास आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मान्यता दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.