Pimpri: ‘मोबाईल अ‍ॅम्ब्युलन्स’द्वारे झोपडपट्ट्यांमध्ये वैद्यकीय शिबिरे घ्या, सामाजिक अंतराचे महत्त्व सांगा – बाबू नायर

एमपीसी न्यूज –   ‘मोबाईल अ‍ॅम्ब्युलन्स’ वापरुन झोपडपट्ट्यांमध्ये  वैद्यकीय शिबिरे घ्यावीत, स्वच्छता मोहिम राबवावी. झोपडपट्टीवासिय, गरीब लोकांमध्ये सामाजिक अंतराचे महत्त्व सांगावे, समुपदेशन करावे. सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन, अधिका-यांचे वेतन घेवून आपत्तीच्या उपाययोजना कराव्यात. या निधीतून शहरातील गरीब आणि गरजू लोकांना धान्य, डाळी, भाजीपाला या स्वरूपात मदत करावी, अशी सूचना भाजपचे सरचिटणीस, नगरसेवक बाबू नायर यांनी केली आहे.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात नगरसेवक नायर यांनी म्हटले आहे की, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासन अतिशय चांगल्या उपाययोजना करत आहे. त्यामुळे मागील सहा दिवस रुग्ण संख्येत वाढ झाली नाही. परंतु, आता रुग्ण वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे.

झोपडपट्यांमध्ये अधिकच्या सुविधा देण्यात याव्यात. औषध फवारणी करावी. आवश्यक त्या सोई-सुविधा आत्ताच निर्माण करुन ठेवाव्यात. तातडीच्यावेळी कोणतीही अडचण येणार नाही.  ‘मोबाईल अ‍ॅम्ब्युलन्स’ उपलब्ध कराव्यात. झोपडपट्टी, चाळीतील नागरिकांना सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात.

ही राष्ट्रीय आपत्ती आहे. राज्य सरकारवर संपुर्णपणे अवंलबून न राहता नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन, अधिका-यांचा एक दिवसाचा पगार घ्यावा. त्यातून निधीची उभारणी करावी. बजाज कंपनीने या आपत्तीसाठी आर्थिक मदत करण्याची तयारी दर्शविली आहे. शहरात त्यांचे कारखाने असून त्यांच्याकडून देखील  आर्थिक मदत घ्यावी. या निधीतून स्वतंत्र अर्थसंकल्प करावा. त्यातून शहरातील गरीब आणि गरजू लोकांना धान्य, डाळी, भाजीपाला या स्वरूपात त्वरित दिलासा द्यावी, अशी मागणी नगरसेवक नायर यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.