Pimpri: दीड कोटीच्या मास्क खरेदीत 60 लाखाचा भ्रष्टाचार-सुलभा उबाळे

एमपीसी न्यूज – पिंपरी महापालिका प्रशासन आणि सत्ताधा-यांनी झोपडपट्टीतील नागरिकांना मास्क वाटप करण्याच्या गोंडस नावाखाली दीड कोटीच्या मास्क खरेदीत 60 लाखाचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप शिवसेना जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी केला आहे. सत्ताधारी पदाधिकारी, नगरसेवकांच्या संस्थांकडूनच मास्क खरेदी केल्याचा आरोपही त्यांनी केला असून या खरेदीची संपुर्ण चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात उबाळे यांनी म्हटले आहे की,  कोरोना व्हायरस या रोगाच्या काळातही प्रशासनाला हाताशी धरुन सत्ताधारी भ्रष्टाचार करत आहेत. झोपडपट्टीमधील गरीब नागरिकांच्या नावाचा गोंडस वापर करून दीड कोटीचे मास्क खरेदी केले आहेत. त्यामध्ये 60 लाखाचा भ्रष्टाचार करणाऱ्या प्रशासन व सत्ताधारी मंडळींनी जनाची नाही  तर मनाची लाज वाटणे गरजेचे होते.

एकीकडे अनेक कंपन्या सामाजिक संस्था मोफत मास्क, सॅनेटायझर अन्नधान्य पुरवत असताना महापालिकेचे सत्ताधारी पदाधिकारी मात्र मेलेल्या मढ्यावरचे लोणी खाण्यात व्यस्त आहेत. मास्क खरेदी केलेल्या संस्था सत्ताधारी भाजप पदाधिकारी, नगरसेवकांच्या आहेत.

काही महिला बचत गटांना काम दिले ती चांगली गोष्ट आहे. परंतु त्यांच्या नावाखाली चुकीची कामे करणे योग्य नाही. आमच्या महिला बचत गटाने 6 रुपयाला कापडी मास्क तेही चांगल्या दर्जाचे बनविले आहेत. त्याचे वाटप गरजू लोकांना केले आहे.

मास्क बनविताना शहरातील सर्व बचत गटांना आव्हान केले असते. तर, महापालिकेचे 50 लाख रुपये वाचले असते. पण महापालिकेत ‘अंधेर नगरी चौपट राजा’ असे कामकाज चालू आहे.

लाईफबॉय साबण खरेदीतही असाच भ्रष्टाचार करून दुप्पट दराने खरेदी झाली आहे. प्रशासन आणि सत्ताधा-यांनी हे धंदे थांबवावेत. मास्क खरेदी प्रकरणाची चौकशी करून जास्तीची रक्कम जबाबदार अधिकारी यांच्याकडून वसूल करावी. अन्यथा  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे कोरोना काळात झालेल्या सर्वच खरेदीच्या चौकशीची मागणी केली जाईल, असा इशाराही उबाळे यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.