Pimpri: नगरसेवकांनो, आक्रमक भूमिका घ्या, चुकीच्या कामांविरोधत आंदोलन करा; अजितदादांचा आदेश

'ज्यांनी घड्याळ घेतले नाही, ते पडले'; विलास लांडे यांना लगाविला टोला

एमपीसी न्यूज – नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घ्यावी. आता आक्रमक भूमिका घेतल्याशिवाय पर्याय नाही हे विसरता येणार नाही. आक्रमक व्हा, महापालिकेतील चुकीच्या कामांविरोधात ठोस आंदोलने करा, असा आदेश राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पक्षाच्या नगरसेवकांना दिला. तसेच विधानसभेला चिंचवडमध्ये फायदा उठविता आला नाही. ज्यांनी घड्याळ घेतले नाही ‘ते’ पडले असे सांगत विलास लांडे यांना देखील टोला लगाविला.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर पवार आज शहरात आले होते. राष्ट्रवादीचे नगरसेवक आक्रमक भूमिका घेत नाहीत अशी तक्रार केली जाते. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, पक्षाचे निवडून आलेले 36 आणि स्वीकृत 2 असे 38 नगरसेवक आहेत. आता नगरसेवकांनी आक्रमक व्हावे. महापालिकेतील चुकीच्या कामांविरोधात आक्रमक भूमिका घ्यावी. ठोस आंदोलने करावीत, अशा सूचना त्यांनी केल्या.

पक्षाचे काही खरे नाही म्हणत काहीजणांनी पक्ष बदलला. त्याचा फटका बसला. महापालिका हातातून गेली अशी खंत व्यक्त करत अजितदादा म्हणाले, विधानसभेला चिंचवडमध्ये पक्षाचा उमेदवार न देता राहुल कलाटे यांना पाठिंबा दिला. सगळे एका विचाराने राहिले असते. तर, वेगळा निकाल लागला असता.

भोसरीतून अजित गव्हाणे याने निवडणूक लढावे ही मनापासून इच्छा होती. स्वच्छ चेहरा होता. परंतु, तो तयार झाला नाही. दत्ता साने यांना देखील शेंडीला गाठ बांधा आणि उभा रहा अस म्हणत होते. परंतु, त्यांनीही तयारी दर्शविली नाही. शेवटी घड्याळ घ्या म्हणत होतो. ज्यांनी घेतले ते निवडून आले. ज्यांनी घेतले नाही ते पडले. साता-यातील शरद पवार साहेबांची पावसातील सभा झाल्यावर सर्व्हे धोवून गेले. वातावरण फिरले. बारामतीत तर विरोधकांचे डिपॉझीट जप्त झाले असेही पवार म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.