Pimpri: फिरत्या बसमधून कोविड चाचणीस सुरुवात; पहिल्या टप्प्यात 25 हजार नागरिकांची होणार चाचणी 

Covid test begins from the mobile bus; In the first phase, 25,000 citizens will be tested

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना बाधितांची संख्या लवकर समजण्यास मदत व्हावी यासाठी फिरत्या बसमधून नागरिकांची कोरोना चाचणीस सुरुवात केली आहे. या उपक्रमासाठी चिंचवड येथील कृष्णा डायग्नोस्टीक या कंपनीने वातानुकुलीत आणि वैद्यकीय साहित्यांनी सुसज्ज टेस्टींग बस मोफत उपलब्ध करून दिली आहे.

मात्र, कोरोना चाचणीसाठी शुल्क आकारले जात आहे. पहिल्या टप्प्यात 25 हजार नागरिकांची टेस्ट अपेक्षित असून त्यासाठी एक कोटी खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.  कृष्णा डायग्नोस्टीक यांच्यासमवेत कार्योत्तर करारनामा करण्यासाठी स्थायी समिती सभेने आज (बुधवारी) मान्यता दिली.

पिंपरी-चिंचवड शहर कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. दररोज शहराच्या विविध भागात कोरोनाचे रूग्ण आढळून येत आहेत. दिवसेंदिवस कोरोना रूग्णांमध्ये वाढ होत आहे.  शहरातील कोरोनाची रूग्ण संख्या 450 वर जावून पोहचली आहे.

साथरोगाच्या या आपत्कालीन परिस्थितीत शहरातील नागरिकांना आवश्यक मदत करण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्याचधर्तीवर कोरोना रूग्णांचे निदान लवकर व्हावे, यासाठी चिंचवड येथील कृष्णा डायग्नोस्टीक या कंपनीने टेस्टींग बस प्रस्ताव सादर केला आहे.

ही बस संपूर्णत: वातानुकुलीत राहणार असून सर्व वैद्यकीय साहित्यांनी सुसज्ज असणार आहे.

या बसमध्ये नागरिकांच्या चाचण्या केल्या जाणार असल्याने कोरोना बाधितांची संख्या लवकर समजण्यास मदत होणार आहे. सर्दी, खोकला, तापाच्या आजाराचे निदान होऊन त्या रूग्णांचे विलीगीकरण करणे शक्य होणार आहे.

तसेच सर्व प्रभागांमध्ये ही बस फिरविल्यास जास्तीत जास्त नागरिकांची टेस्ट होऊन या साथीच्या आजाराला आटोक्यात आणण्यास मदत होईल. या कामासाठी एक वर्षाकरिता काही किंमत आकारण्यात येणार नसल्याचे या कंपनीने कळविले आहे.

तसेच या टेस्टकरिता त्यांनी तीन पॅकेजस सादर केली आहेत. त्यानुसार, शहरातील नागरिकांकडून दर आकारण्यात येणार आहेत.

तपासणीसाठी शुल्क आकारणार

पहिल्या पॅकेजमध्ये डिजीटल एक्स-रे, रक्तदाब, शरिरातील ऑक्सिजन प्रमाण, शरिराचे तापमान आणि सीबीसी, सीआरपी या चाचणीसाठी 400 रूपये शुल्क आकारण्यात येणार आहे. दुस-या पॅकेजमध्ये स्क्रिनिंग पॅकेज एक अधिक रॅपिड अँटीबॉडी बेस्ट कोविड 19 टेस्ट साठी एक हजार रूपये शुल्क घेण्यात येणार आहे.

तर, तिस-या पॅकेजमध्ये कोविड 19 आरटी – पीसीआर स्वॅब टेस्ट साठी 2500 रूपये आकारले जाणार आहे. तसेच उप पॅकेजमध्ये डीमर रक्त तपासणीसाठी 600 रूपये शुल्क घेण्यात येणार आहे. ही बस एक वर्षे कालावधीसाठी मोफत असणार आहे.

बसचा खर्च, डिझेल, वाहनचालक, देखभाल-दुरूस्ती यासाठी त्यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला दिला जाणार नाही. पहिल्या टप्प्यात 25 हजार नागरिकांची टेस्ट करणे प्रस्तावित आहे. यासाठी एक कोटी रूपये अपेक्षित आहे. त्यानुसार, कृष्णा डायग्नोस्टीक यांच्यासमवेत  करारनामा केला जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.