Pimpri : प्रभाग स्तरावर तत्पर पथके तयार करा; टेम्प्रेंचर गनद्वारे नागरिकांची तपासणी करा

भाजप पदाधिका-यांच्या आयुक्तांना सूचना

एमपीसी न्यूज – कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयातंर्गत तत्पर पथके तयार करावीत. यामध्ये 10 कर्मचारी असतील, अशी व्यवस्था तयार करुन त्या पथकाच्या माध्यमातुन कोरोना संदर्भातील माहिती घेवून सर्व अडचणी सोडविण्यात याव्यात. पथकांच्या माध्यमातून त्या-त्या भागात टेम्प्रेंचर गनद्वारे झोपडपट्टीतील नागरिकांची तपासणी करावी, अशा सूचना भाजप आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

महापालिका कार्यक्षेत्रात कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी करावयाच्या कार्यवाही संदर्भात दोनही आमदारांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासमवेत बैठक घेतली.

प्रशासनाला विविध सूचना केल्या. महापौर उषा ढोरे, सभागृह नेते नामदेव ढाके, स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे, माजी सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे, मनोज लोणकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय आदी उपस्थित होते.

झोपडपट्टीतील नागरिकांना साबण व मास्कचे वाटप करावे. सर्व क्षेत्रिय कार्यालयात एक जबाबदार अधिकार्‍याची नेमणूक करुन त्यांना निर्णय घेण्याचे अधिकार द्यावेत. पिंपरी-चिंचवड शहर औद्यागिकनगरी असून येथे बहुतांश कामगार वर्ग परप्रांतीय नागरिक वास्तव्य करीत आहे.

सद्या देशात लॉकडाऊन असल्यामुळे सर्व कारखाने बंद आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्या कामगारांवर उपासमारीची वेळ येवू नये यासाठी दररोज 30000 लोकांना सकस जेवण देण्याची व्यवस्था करावी.

त्याचबरोबर शहरातील किराणा दुकानदार, भाजी विक्रेते, फळ विक्रेते, सफाई कर्मचारी, रेशनिंग दुकानदार व अत्यावश्यक सेवा पुरविणार्‍या व्यक्तींशी अधिकचा संपर्क असणार्‍यांची तपासणी या पथकाद्वारे करण्यात यावी. ज्या क्षेत्रामध्य कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येतील तो परिसर तातडीने कमीत कमी वेळेत सील करुन त्या भागातील तपासणी सुरू करावी.

कोरोनाची प्रार्श्वभूमी लक्षात घेता डॉक्टर, नर्सेस, लॅब टेक्निशियन, वार्ड बॉय यांची तात्पुरत्या स्वरुपात मानधनावर भरती करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.