Pimpri: कोरोना संशयितांचे स्वॅब घेण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयनिहाय टीम तयार करा – महापौर

Pimpri: Create Zonal office wise team to collect a swab of Corona suspects - Mayor लॉकडाऊन शिथिल केल्यापासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याबद्दल महापौर उषा ढोरे यांनी चिंता व्यक्त केली.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. तपासण्या लवकर होणे आवश्यक आहे. कोरोना संशयितांचे स्वॅब घेण्यासाठी क्षेत्रिय कार्यालय निहाय आठ स्वतंत्र टीम तयार करण्याच्या सूचना महापौर उषा ढोरे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेत आज (गुरुवारी) महापौर ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व गटनेते व अधिकारी यांची बैठक पार पडली. त्यावेळी महापौरांसह पदाधिका-यांनी कोरोनाचा आढावा घेत विविध सूचना केल्या.

‍शहरामध्ये लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. लोक घराबाहेर पडल्याने व शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन होत नसल्यामुळे कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. शासनाने 17 मे पासून लॉकडाऊन शिथिल केले. त्यानंतर दुकाने, इंडस्ट्रीज व इतर आस्थापना उघडण्याच्या सवलती देण्यात आल्या. यामुळे नागरिकांची शहरात वर्दळ वाढल्याने तेव्हापासून पूर्वीच्या तुलनेत झपाट्याने रुग्ण संख्या वाढू लागली आहे.

महापालिकेच्या वतीने शहरात 7 ठिकाणी कोव्हीड केअर सेंटर व  4 ठिकाणी डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर सुरु करण्यात आली आहेत. याशिवाय शासनाच्या निर्देशानुसार शहरातील खाजगी रुग्णालयातील 80 टक्के बेड नियंत्रीत करण्यात आले आहेत. त्याचबरोबर कोरोनावर तातडीने नियंत्रण मिळवण्यासाठी नव्याने संशयीत रुग्णांचे जागेवरच स्वॅब घेण्यासाठी आठ स्वतंत्र टिम तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये 2 डेंन्टीस्ट, 2 संगणक ऑपरेटर, 1 नर्स व 1 मदतनीस यांचा सहभाग असणार आहे. तसेच त्यांच्याबरोबर एक रुग्णवाहिका व कर्मचा-यांच्या प्रवासासाठी एक वाहन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

या आठ टीम महापालिकेच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयांमध्ये कार्यरत असणार आहेत. तसेच येत्या आठ दिवसामध्ये महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालय येथे देखिल स्वॅब टेस्टींगची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. यामुळे आठ क्षेत्रिय कार्यालयानुसार कोरोना संदर्भात कामकाजाची विभागणी केल्यामुळे एकटया यशवंतराव चव्हाण रुग्णालयावर येणारा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.  तसेच कोरोना संदर्भातील स्थानिक स्तरावर कार्यवाही करण्याचे सर्व अधिकार आठही क्षेत्रिय अधिका-यांना प्रदान करण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोना संशयीत रुग्ण तपासणी व कंटेनमेंट झोन निश्चित करणे, कंटेनमेंट झोन रदद करणे ही सर्व कामांना गती मिळणार आहे.

यावेळी सर्वपक्षीय गटनेते व उपस्थित नगरसदस्यांनी सुचना मांडल्या. त्यावर योग्य तो विचारविनिमय करुन त्या तातडीने मार्गी लावण्याचे आदेश महापौर ढोरे व पक्षनेते नामदेव ढाके यांनी प्रशासनास दिले.

उपमहापौर तुषार ‍हिंगे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते नाना काटे, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष गटनेते कैलास बारणे, नगरसदस्य सागर आंगोळकर, तुषार कामठे, शशिकांत कदम, नगरसेविका शर्मिला बाबर, योगिता नागरगोजे, अतिरीक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, प्रविण तुपे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, डॉ. पवन साळवे, डॉ. राजेंद्र वाबळे यांच्यासह सर्व क्षेत्रिय अधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.