Pimpri : वैचारिक लेखनातून नव्या समाजाची निर्मिती व्हावी – अरुणा ढेरे

एमपीसी न्यूज – लेखन अनुभवावर आधारित असावे. वैचारिक लेखन करणे आणि ते समाजापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. वैचारिक लेखन समाजापर्यंत उत्तमरीत्या पोहोचल्यास त्यातून नव्या समाजाची निर्मिती होईल, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरुणा ढेरे म्हणाल्या.

क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलीत पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् आयोजित श्री. ग. माजगावकर भाषा व संस्कृती संवर्धन केंद्राचे उद्घाटन सोमवारी (दि. 6) सायंकाळी सहा वाजता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा, लेखिका, कवयित्री अरुणा ढेरे व मराठी साहित्य संस्कृती महामंडळाचे अध्यक्ष प्रसिद्ध विचारवंत लेखक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

  • यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह डॉ. प्रविण दबडघाव, चापेकर बंधूंच्या घराण्यातील कवयित्री मानसी चापेकर, पिंपरी-चिंचवड महाराष्ट्र साहित्य परिषदेचे साहित्यिक राजन लाखे, साहित्यप्रेमी मुरलीधर साठे, पुरुषोत्तम सदाफुले, संतोष गाढवे, डॉक्टर रंजना नवले, शास्त्रज्ञ अशोक नगरकर, आर्य समाजाचे विवेक शास्त्री, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे कार्यवाह अॅड. सतीश गोरडे, उपाध्यक्षा शकुंतला बन्सल, सहकार्यवाह रविंद्र नामदे, अध्यक्ष गिरीश प्रभुणे, सदस्य गतिराम भोईर, अशोक पारखी, कोषाध्यक्ष संजय कुलकर्णी, खिंवसरा पाटील विद्यामंदिर चे मुख्याध्यापक नटराज जगताप आदी उपस्थित होते. दिलीपराव माजगावकर यांच्या देणगीतूनच हे केंद्र सुरू झाले.

यावेळी अरुणा ढेरे म्हणाल्या, “पुनरुत्थान समरसता गुरुकुलम वेगवेगळ्या समाजातील मुलांना उभं करायला शिकवत आहेत. आजचं साहित्य फारसं अनुभवाशी संबंधित नाही. जात्यावर दळण करताना, मुसळावर कांडताना, शेतीची कामे करताना गायली जाणारी गाणी हे खरं साहित्य आहे. या साहित्याला कोणीही कुणाचंही नाव दिलं नाही. शब्द कागदावर आला आणि तो संबंधित लेखक, कवीच्या नावाने लागला गेला. नागर साहित्यिकांनी त्याला तोडून नवे साहित्य निर्माण केले आहे. गुरूकुलममधील मुलं बहुभाषिक आहेत. ही या गुरुकुलमची संपत्ती आहे. लोकसंस्कृतीचा संवाद वाढला पाहिजे. लोकसंस्कृतीचे संवर्धन करताना वेगवेगळ्या समाजातील मुलांकडे ज्या बोली भाषा, त्यांची संस्कृती आहे, त्याला जाग आणून त्यात भर घातली तर लोक आणि नागर या दोन्ही संस्कृतीमधला संवाद वाढेल. हा पूल समरसता गुरुकुलममुळे अधिक बळकट होणार आहे.

  • गुरुकुलमध्ये अनेक जातींची मुले एकत्र शिकत असल्याने इथली मुले बहुभाषिक होत आहेत. आपण भाषेने एकमेकांशी तुटायचे नाही, तर उलट भाषने संस्कृतीशी जोडायचे आहे. या संस्कृतीची वीण गुंफली गेली पाहिजे. आणि अशी वीण गुंफण्याचे काम भाषा व संस्कृती केंद्रामार्फत गिरीश प्रभुणे करीत आहेत, हे खरोखरच कौतुकास्पद आहे, असेही ढोरे म्हणाल्या.

डॉ. सदानंद मोरे म्हणाले, “भाषा आणि संस्कृती यांचे नाते फार जवळचे आहे. संस्कृती भाषेमध्ये नांदत असते. शिल्प, कलाकृती ही संस्कृतीची प्रतीके असली तरी ती एक प्रकारची भाषा आहे. वेगवेगळ्या संस्कृतीचा अभ्यास या केंद्रात केला जाणार आहे. पुनरुत्थान समरसता गुरुकुलम मध्ये श्रमिक आणि वैचारिक या दोन्ही वर्गाचा समन्वय साधला आहे. इथे भटक्या, विमुक्त, जाती जमातींच्या मुलांना म्हणजेच श्रमिक वर्गाला इथे विचार करण्यास चालना दिली जात आहे.

  • संस्कृती ही भाषेमध्ये नांदत असते. भाषा व संस्कृतीचा विचार हा एकत्रितच केला पाहिजे. आपला आत्मलोभ, आपला सत्व टिकवून परकीय भाषेचे ज्ञान घेतले पाहिजे. कारण परकीयांबरोबर टिकून राहण्यासाठी त्याची गरज आहे. पण त्याबरोबर आपण आपल्या संस्कृतीला जपले पाहिजे. श्रम करणाऱ्यांनी विचार केला पाहिजे व विचार करणाऱ्यांनी श्रम केले पाहिजे. म्हणजे या दोघातील संघर्ष कमी होऊन एकात्म संस्कृती निर्माण होईल. असे कार्य इथल्या गुरुकुलम् शिक्षण पद्धतीत सुरू आहे, असेही मोरे म्हणाले.

गिरीश प्रभुणे म्हणाले, “सध्या भाषा व संस्कृती संवर्धन केंद्रात दहा हजार पुस्तके आहेत. आपल्या भारतात नंदीवाले, मरीआईवाले, गोंधळी, पारधी अशा अनेक दोन हजार कलाकारांच्या जाती भारतात आहे. पूर्वीच्या विविध जातीतील स्त्रिया दैनंदिन कामे करताना म्हणजे मोटेचे पाणी काढताना, शेतात भात लावणी करताना, जात्यावर दळण दळताना सहजगत्या ओव्या, गाणी, अभंग गात असत.

  • या स्त्रिया अडाणी होत्या, परंतु शाळा सुरु झाल्यापासून वरील जातींचे मूलतः असणारे ज्ञान कमी झाले. अशा भटक्या विमुक्त जातीतील मुलांना आम्ही गुरुकुल मध्ये आणून त्यांचे मूलतः असणारे ज्ञान अबाधित ठेवून सद्यस्थितीचे ही ज्ञान त्यांना मिळावे म्हणून गुरुकुल सुरू केले. वेगवेगळ्या जातींच्या भाषांचा व संस्कृतीचा अभ्यास केला तरच भाषा व संस्कृतीचा विकास होईल. अशा अभ्यासाची सवय मुलांना शाळेपासूनच लागावी म्हणून गुरुकुलमध्ये भाषा व संस्कृती संवर्धन केंद्र सुरू करण्यात आले आहे.

मानसी चापेकर यांनी, ‘मराठी भाषा ही इतर बोली भाषा व संस्कृतींना जपणारी व पुढे घेऊन जाणारी आहे’ असे म्हणत स्वरचित ‘मोरपीस’ ही कविता आपल्या सुरेल आवाजात सादर केली. डॉ. प्रविण दबडघाव यांनी गिरीश प्रभुणे यांच्या कार्याचे कौतुक केले व श्री. ग. माजगावकर भाषा व संस्कृती संवर्धन केंद्राच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

  • कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी, हिंदी, इंग्रजी या विषयात पारंगत असणारे दिगंबर ढोकले यांनी केले. आभार क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे कार्यवाह अॅड. सतीश गोरडे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.