Pimpri : विद्यार्थ्याला धमकावल्याप्रकरणी डॉ. डी. वाय. पाटील विधी महाविद्यालयाच्या प्राध्यापिकेवर गुन्हा

एमपीसी न्यूज – डॉ. डी. वाय. पाटील विधी महाविद्यालयात अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याला घालून पाडून बोलून नापास करण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका प्राध्यापिकेवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी (दि.4) सकाळी साडेअकराच्या सुमारास पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विधी (लॉ) कॉलेज येथे हा प्रकार घडला.

कृष्णा गोविंद वाघमारे (रा. इंद्रायणी नगर, पुणे) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कृष्णा संत तुकाराम नगर पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील लॉ कॉलेजमध्ये एलएलबी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत आहेत. तर आरोपी महिला त्या कॉलेजमध्ये प्राध्यापिका आहेत. सोमवारी (दि. 4) सकाळी साडेअकराच्या सुमारास लेक्चर संपल्यानंतर प्राध्यापिका यांनी कृष्णा यांना ऑफिसमध्ये बोलावून घेतले.

ऑफिसमध्ये बोलावून त्यांनी कृष्णा यांना ‘तू कसा पास होतो? ते मी बघते. कॉलजेचे प्रिन्सिपल सर्व माझ्या हाताखाली आहेत. तुझी डिग्री घेण्याची लायकी नाही. तुझे करिअर बरबाद करते.’ अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.