Pimpri : बेकायदेशीर फ्लॅटवर ताबा घेतल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा

एमपीसी न्यूज – कुलूप लावून बंद असलेल्या फ्लॅटचे कुलूप तोडून फ्लॅटचा जबरदस्तीने ताबा घेतला. त्यामध्ये भाडेकरू ठेऊन दुसरे कुलूप लावले. याबाबत विचारणा करणा-या महिलेला आरोपी महिलेने शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. ही घटना गॅलेड चौक पिंपरी येथे घडली.

भाग्यश्री सुनील यादव (वय 41, रा. नवी सांगवी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार लता किसन कांबळे (रा. बलदेव नगर, पिंपरी) या महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गॅलेड चौक पिंपरी मधील सी ब्लॉक फिर्यादी भाग्यश्री यांचा फ्लॅट आहे. त्यामध्ये त्यांनी प्रिंटिंग मशीन आणि इतर साहित्य आणि कागदपत्रे ठेवली होती. 6 नोव्हेंबर 2018 ते 3 फेब्रुवारी 2019 या कालावधीत भाग्यश्री यांचा फ्लॅट कुलूप लावून बंद होता. आरोपी महिलेने बेकायदेशीररित्या फ्लॅटचे कुलुप तोडले.

जबरदस्तीने फ्लॅटचा ताबा घेतला. त्यामध्ये भाडेकरू ठेऊन स्वतःचे कुलूप लावले. याबाबत फिर्यादी भाग्यश्री यांनी विचारणा केली असता आरोपी महिलेने त्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. तसेच ‘तुला बघून घेईन’ अशी धमकी दिली. याबाबत शनिवारी (दि. 2) पिंपरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निकम करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.