Pimpri Crime : केंद्र सरकारने केलेल्या शेतकरी व कामगार कायद्यातील बदलाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कामगारांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – केंद्र सरकारने शेतकरी व कामगार कायद्यात केलेल्या बदलाच्या विरोधात गुरुवारी (दि. 26) पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात निषेध व्यक्त केला. याबाबत निषेध व्यक्त करणाऱ्या कामगारांवर प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कामगार नेते कैलास कदम, इरफान सय्यद, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, संजीवन कांबळे, संदीप भेगडे, केशव घोळवे, किशोर ढोकळे, दिलीप पवार, अनिल माधवराव रोहम, अजित अभ्यंकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांवर भारतीय दंड विधान कलम 188, 269, महाराष्ट्र पोलीस कायदा, साथीचे रोग अधिनियम, राष्ट्रीय आपत्ती अधिनियम, महाराष्ट्र कोविड 19 उपाययोजना अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिला पोलीस शिपाई मीनाक्षी प्रभू राळे यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि त्यांचे अनेक समर्थक कामगार गुरुवारी एकत्र आले. मानवी साखळी तयार करून केंद्र सरकारने कामगार व शेतकरी कायद्यात केलेल्या बदलाचा झेंडे, फ्लेक्स, बॅनर घेऊन तसेच घोषणा देऊन निषेध व्यक्त केला. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर शहरात लागू असलेल्या संचारबंदी आणि जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.